
ठाणे : डोंबिवलीत एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय . हि घटना कल्याण शीळ रोड टाटा पॉवर जवळ घडली आहे. बाबू चव्हाण (वय ६० ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे .
कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये एमआयडीसीचे उघडे चेंबर होते. मयत चव्हाण रस्त्याने चालत असताना पाय घसरून ते थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडले . त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढून उपचारासाठी डोंबिवली मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बाबू चव्हाण यांचा जीव गेला असल्याचा दावा तेथे उपस्थित नागरिकांनी केला .
या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती. वारंवार एमआयडीसीकडे तक्रार करून देखील एमआयडीसीने याकडे दुर्लक्ष केले . त्यांच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे . संतप्त नागरिकांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे.
चव्हाण यांच्या मृत्यूसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे.