
कथा : प्रा. देवबा पाटील
आ ता रोजच आदित्य, सुभाष व त्यांची मित्रमंडळी यांच्या शाळेच्या मधल्या सट्टीमध्ये सूर्याबद्दलच्या ज्ञानाची देवाणघेवाण सुरू असायची.
“सूर्यप्रकाश हा सात रंगांचा बनलेला असूनही सूर्य पांढरा का दिसतो?” मोन्टूने प्रश्न केला.“आपला सूर्यप्रकाश हा सात रंगांचा बनलेला असून या सात रंगांच्या एकत्रीकरणापासून पांढरा रंग तयार होतो म्हणून सूर्य आपणास पांढरा दिसतो.” सुभाषने उत्तर दिले.
“बरे, सूर्यप्रकाशात सात रंग असूनही ऊन पिवळे-सोनेरी का दिसते?”
अंतूने विचारले.
सुभाष म्हणाला, “आपला सूर्य हा पिवळ्या रंगाचा प्रकाश देतो म्हणून त्याला पीतवर्णी तारा म्हणतात. म्हणूनच ऊन सोनेरी-पिवळे दिसते. सूर्यप्रकाशात जी सात रंगकिरणे आहेत. त्या प्रत्येकाची तरंगलांबी वेगवेगळी आहे.”
“तरंगलांबी म्हणजे काय असते?” पुन्हा अंतूने मध्येच प्रश्न केला.
“प्रकाश हा तरंगाच्या स्वरुपात प्रवाहित असतो म्हणजे वाहतो हे तर आपण शिकलोच आहोत.” सुभाष म्हणाला.
“हो गड्या, पण
सर्वच गोष्टी एकदम आठवत नाहीत.”
अंतू म्हणाला.
सुभाष सांगू लागला, “तरंगाच्या एका शिखरापासून ताबडतोब येणाऱ्या दुसऱ्या शिखरापर्यंतची लांबी म्हणजे तरंग लांबी. यांपैकी तांबडा, नारिंगी, पिवळा हे दीर्घ तरंगलांबीचे व निळा, पारवा, जांभळा हे लघु तरंग लांबीचे किरण आहेत, तर हिरवा हा मध्यम तरंगलांबीचा आहे.”
“आकाशाला निळा रंग कसा येतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?” ते सांगू का आधी?” सुभाषने विचारले.
“अरे हो सांग की.” आदित्य बोलला.
“पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील धूलिकणांवरून निळा, पारवा व जांभळा या लघुतरंगलांबीच्या किरणांचे जास्त विकिरण होते; परंतु प्रकाशात निळ्या रंगाचे प्रमाण जास्त असल्याने निळ्या रंगाचे सर्वांत जास्त विकिरण झाल्यामुळे निळा रंग आकाशात जास्त प्रमाणात चौफेर विखुरतो व आकाशाला निळा रंग येतो. उरलेले दीर्घ तरंगलांबीचे व मध्यम तरंगलांबीचे म्हणजे तांबडा, नारिंगी, पिवळा व हिरवा यांचे मात्र विशेष विकिरण न झाल्यामुळे ते पृथ्वीवर सहजतेने येऊन पोहोचतात. त्यांच्या मिश्रणामुळे सूर्याचे ऊन हे पिवळसर सोनेरी दिसते.” सुभाषने सविस्तर सांगितले.
“दृश्य व अदृश्य वर्णपट कसे असतात मित्रा?” अंतूने विचारले.
“आपण डोळ्यांनी ज्या तांबड्या ते जांभळ्या रंगकिरणांच्या लहरी बघू शकतो त्यांना दृश्य-प्रकाश वर्णपट म्हणतात. इतर रंगकिरणांचा वर्णपट डोळ्यांना दिसत नसल्याने त्याला अदृश्य-प्रकाश वर्णपट असे म्हणतात.” आदित्यनेच उत्तर दिले.
“या सूर्यप्रकाशात आपणास त्रिकोणी लोलकातून दिसणारे सात रंगकिरणे आहेत हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच. पण या सात रंग किरणांव्यतिरिक्त सूर्यप्रकाशात आणखी काय काय असते?” बन्टूने प्रश्न केला.
सुभाष सांगू लागला, “सूर्यप्रकाशात दृश्य सात रंगांव्यतिरिक्त काही अदृश्य किरणही आहेत. जांभळ्या रंगकिरणांच्या खाली प्रथम अदृश्य असे अतिनील किंवा नीलातीत किरण, त्यानंतर कमी तरंग लांबीचे क्ष-किरण व शेवटी गॅमा किरण असतात तर तांबड्या रंगकिरणांच्या वरच्या बाजूला कमी कंपनसंख्येचे म्हणजेच जास्त तरंगलांबीचे अतिरक्त किरण असतात...”
“हे कमी ते जास्त हे समजले नाही गड्या.” मध्येच पिंटूने म्हटले.
“कंपनसंख्या वा कंप्रता आणि तरंगलांबी हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे कंपनांक कमी तर तरंगलांबी जास्त आणि कंपनांक जास्त तर तरंगलांबी कमी असे उलटसुलट ते असतात, तर तांबड्या रंगाच्या वरच्या बाजूला जास्त तरंगलांबीचे अतिरक्त किरण असतात त्यांना अवरक्त किरण असेही म्हणतात. त्यापेक्षा अधिक लांबीच्या लहरींना रेडिओ लहरी म्हणतात. ते रेडिओ, दूरचित्रवाणी व रडार यांच्यासाठी वापरले जातात. तसेच वैश्विक किरणही सूर्यप्रकाशात असतात. सप्तकिरण व हे सर्व तरंग मिळून जो पृथक्कारित पट्टा तयार होतो त्यालाच वर्णपट म्हणतात. अतिनील किरण व क्ष-किरण हे काही प्रमाणात थोडेफार उपयोगीही आहेत; परंतु गॅमा किरण मात्र घातकीच आहेत.” सुभाषने सांगितले नेमेचि येतो पावसाळाप्रमाणे नेमेचि त्यांच्या शाळेच्या मधल्या सुट्टीची घंटी वाजली व त्यांच्या ज्ञानदायी
गप्पा थांबल्या.