प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
माझ्या महाविद्यालयात माझा एक सहकारी आहे. खेडेगावातून तो नोकरीनिमित्त मुंबईत आलेला होता. नव्यानेच त्याची महाविद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. एकदा त्याला रेल्वे स्टेशनपर्यंत गाडीतून सोडले. तो मला म्हणाला, “काय मजा आहे तुमची... खुर्चीत बसल्यासारखं गाडीत बसायचं आणि कुठंही जायचं?” मीही हसले. त्याच्यानंतर काही काळ गेला. साधारण दहा वर्षांनंतर त्याने गाडी विकत घेतली. पहिल्या आठवड्यात सिग्नल तोडल्यामुळे दंड भरावा लागला.
दुसऱ्या आठवड्यात त्याने एका मोटर सायकलवाल्याला धडक दिली. त्यानंतर पोलीस केस, मानहानी, दंड वगैरे. फक्त त्या मोटरसायकल धारकाला खर्चटण्यापलीकडे काही झाले नव्हते म्हणून नशीब! त्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी त्याला गमतीत म्हटले, ‘‘खुर्चीत बसल्यासारखं गाडीत बसायचं... मज्जाच ना?” तर तो अगदी मनापासून खळखळून हसलाआणि मला म्हणाला, “तुम्हाला अजून आठवतंय?”
दुसरी माणसं जी कामे करतात ती आपल्याला नेहमी सोपी वाटतात; परंतु आपण जेव्हा ती कामे करायला जातो तेव्हा कष्ट, तंत्रज्ञान, कामाबद्दलची एकनिष्ठता इत्यादी गोष्टी लक्षात येतात. सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये एका कुटुंबातील स्त्री-पुरुषांचा संवाद कधीतरी पाहिल्याचे मला आठवतेय. पुरुष त्या घरातील स्त्रीला विचारतो, “तू काय मोठं काम करतेस?” आणि मग ती स्त्री त्यांना म्हणते, “एक दिवस तुम्ही माझं काम करून बघा.” मग दिवसभर घरातला पुरुष आणि मुलं ती करत असलेली कामे करतात आणि त्यांच्या लक्षात येते की कामे किती अवघड आहेत. कधी कधी असे प्रसंग विनोदी अंगाने दाखवले जातात. कधी गंभीरपणे... आणि हे सर्व पाहिल्यावर एक अभंग नक्की आठवतो.-
साखरीची चव मुंगी कैंसी चाखे।
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे।।
उगाच नाही तुकाराम महाराजांना ‘जगद्गुरू’ म्हटले जाते. कोणे एके काळी इतके मोठे वैश्विक ज्ञान त्यांनी सहज सोप्या अभंगातून आपल्याला दिलेले आहे.
दादरला श्री स्वामी समर्थ मंदिराच्या गल्लीच्या तोंडाशी एक चहाची टपरी आहे. तिथे चहा घेऊन मी बाहेर पडत होते. तेव्हा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि मला रुमाल घेण्याचा आग्रह करू लागला.
मी त्याला सांगितले की, मी रुमाल वापरत नाही तर तो मला म्हणाला की, कोणाला भेट देण्यासाठी घ्या. मी रस्त्यावरच्या बेंचवरून या मुलाला बऱ्याच जणांकडे जाताना पाहिले होते, पण कोणीही त्याच्याकडून रुमाल घेतले नाही, याचीही मी नोंद घेतली होती. मग मी त्याला विचारले, “काय रे सकाळपासून किती धंदा झाला?” तर तो म्हणाला, “एकही पाकीट विकले गेले नाही.
” मी त्याला विचारले,
“मग आता तू काय करायचं ठरवलं आहेस?”
तो त्रासून म्हणाला,
“मला असे वाटते की या भागात विक्री होत नाही, कुठल्या तरी दुसऱ्या भागात जाऊन विक्री करायचा मी प्रयत्न करतो. मला आज कमीत कमी एक पाकीट तरी
विकायचेच आहे.”
या वाक्यासरशी मी त्याला विचारले,
“पण एक पाकीट विकून तुझे पोट भरेल का?”
तर तो उत्तरला, “मला चाळीस हजार रुपये पगार मिळतो. त्यात माझे पोट व्यवस्थित भरते.”
“अरे मग तू हे रुमाल का विकतो आहेस?”
तर तो म्हणाला,
“मॅडम तुम्ही विचारतच आहात म्हणून मी सांगतो, सहा महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचे आणि माझे भांडण झाले आणि मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही माझ्यासाठी काय केलं?’ तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी वडील गेले तेव्हा आई म्हणाली की, तुझ्या त्या दिवशीच्या बोलण्यानंतर वडील खचून गेले. त्यांनी तुझ्यासाठी काय केले हे मी सांगते... त्यांनी दादरच्या रस्त्यावर रुमाल विकून पैसे मिळवले. तुझे पदवीपर्यंतचे शिक्षण केले, ते केवळ त्या पैशांवर. आज तुला नोकरी लागली, तू चांगले कमवत आहेस; परंतु त्यांनी तुझ्यासाठी जे केले ते तू एक दिवस करून बघ म्हणजे तुला ते काय करत होते हे कळेल. मी खरंच विचार केला आणि सरळ घरात असलेल्या रुमालांची पाकीट घेऊन बाहेर पडलो. माझ्या लक्षात आले की, एक वेळ भीक मागणे सोपे आहे. लोक एखादं नाणं पदरात टाकतात; परंतु अशी प्रत्येक माणसाच्या जवळ जाऊन एखाद्या वस्तूची विक्री करणं खरंच कठीण आहे!”
त्याने डोळे पुसले आणि तो चालू लागला. त्याच्याशी मला काही बोलायचे होते, पण मी स्तंभित झाले आणि विचारांच्या गर्तेत अडकून गेले. त्यामुळे आज आपण जे काही आहोत, ते केवळ आपल्या आई-वडिलांमुळे हे कोणत्याही वयात, कोणत्याही मुलांनी विसरता कामा नये, एवढी जरी शिकवण हा लेख देऊन गेला तरी पुरे! शिवाय, ‘माझ्यासाठी काय केलं?’ हा प्रश्न जेव्हा तुमची मुलं तुम्हाला विचारतील तेव्हा त्याचे उत्तर देण्याची मानसिक तयारी करून ठेवायला हरकत नाही!
pratibha.saraph@ gmail.com