
अश्विनी भोईर
‘पाऊस’ हा शब्द उच्चारताच मनात आवाजांचे अनेकविध तरंग उठू लागतात... पावसाच्या बरसण्याच्या जितक्या तऱ्हा तितके त्याचे आवाज... कधी तरी तान्हुल्याच्या मऊशार जावळाप्रमाणे अलवार बरसणारा पाऊस... तर कधी कधी वाऱ्यावर सळसळणाऱ्या पानांसारखा सरसर करत पडणारा पाऊस... आणि हो जोरजोरात ढोल बडवावेत तसा वाजत-गाजत येणारा मुसळधार पाऊस... आताशा दिवसांत तर हा पाऊस अगदी लहरीच झाला आहे. कधी बरसेल आणि कधी दडी मारेल याचा थांगपत्ताच राहिला नाही, पण जेव्हा कधी पाऊस बरसू लागतो, तेव्हा मात्र सृजनाचे गाणे घेऊन येतो. शहरातील इमारतींच्या जंगलातही कुठंतरी हलकासा मृदगंध दरवळत असतो, फक्त तो जाणवण्यासाठी पोटापाण्यासाठी झपझप पडणाऱ्या पावलांना थोडंसं थबकावं लागतं... थोडंस रेंगाळावं लागतं. सर्वसामान्य माणसाला आयुष्यात पोटापाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष मोठा आहे. घड्याळाच्या काट्यावर चालणारे माणसाचे आयुष्य सतत पळतच असते. निसर्गाची धून कुठेतरी हरवत जाते पण पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा बरसतात तेव्हा नकळतच जो-तो आपापल्या परीने पावसाचा आनंद घेताना दिसतो.

आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफित मोकळ्या केसात गं
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात गं
अक्षर माऊली शांताबाई शेळकेंच्या या काव्यपंक्ती म्हणजे पावसापेक्षा अधिक धरतीचच गान ! गच्च भरलेल्या आभाळातून जलधारा बरसतात त्या तप्त धरतीच्या मिलनाच्या आवेगाने... आणि मग तो पाऊस... त्या जलधारा... जलधारा राहतच नाहीत... तर या मिलनात दडलेले असते सृजनाचे गान... ज्याची ग्वाही देतो अलवार दरवळणारा मृद्गंध!
नि मृद्गंधासोबतच चाहूल लागते ती आषाढ – श्रावणाची... सृजनाचं दान शेतात पेरून लेकुरवाळ्या विठुमाऊलीच्या ओढीने महाराष्ट्रातला कष्टकरी वारकरी पंढरीच्या दिशेने संतांच्या मांदियाळीचा जयघोष करत सगळा क्षीण विसरून चालू लागतो... घाटमाथ्यांवर जमा झालेले काळे ढग... हिरवेगार डोंगर... डोंगररांगांमधून खळाळणारे झरे... नि त्यामधून जाणारा वैष्णवांचा मेळा... म्हणजे जणू ब्रह्मानंदी टाळीच ! एकीकडे आषाढतल्या जोरदार कोसळणाऱ्या सरी... नि दुसरीकडे वैष्णवांच्या भक्तीचा लोटलेला महापूर... यांचे सायुज्य! गच्च्च भरलेलं आभाळ रित रित होत जात आणि सुरू होतो तो श्रावणातील ऊन – पावसाचा पाठशिवणीचा खेळ.
श्रावण महिना म्हणजेच निसर्गाच्या सौंदर्याची उधळण. हा ऋतू म्हणजे धरतीने ल्यायलेला नवचैतन्याचा पदर. आषाढाच्या मुसळधार पावसानंतर श्रावणात जाणवतो पावसाचा लयबद्ध संगीतसारखा साज - न कोरडा, न धो – धो. आभाळ भरलेलं असतं, पण त्याच्या कुशीतून उतरतो तो निसर्गाचा गंधित श्वास!
श्रावण सुरू होताच सृष्टी नव्या रंगांनी सजते. हिरवागार शालू धरतीने पांघरलेला असतो, डोंगर-दऱ्या धुकेदार स्वप्नांसारख्या वाटतात. झाडांची पानं नुसती हिरवी नसतात, तर त्या हिरव्या रंगाला ओलसर गंधाची किनार असते. झऱ्यांचे पाणी खळखळाट करत वाहते, जणू निसर्गाचे अमूर्त संगीत.
सोनचाफा, प्राजक्त, जास्वंद, कणेरी, अनंत, चमेली, तगरी, तेरडा, गुलबक्षी, सोनटक्का अशा विविध रंगांच्या - गंधांच्या फुलांनी आसमंत दरवळू लागतो. सोनटक्का आणि ब्रह्मकमळ जोमाने पावसाळ्यात उमलू लागतात. ऑगस्ट - सप्टेंबर या महिन्यात ब्रह्मकमळांना बहर येतो. मला आठवते ब्रह्मकमळावर कळी आली की ओढ लागायची ती पूर्ण फुललेले ब्रह्मकमळ पाहण्याची. पण हो या फुलांची खासियत अशी की काहीसा उग्र पण आल्हाददायक गंध असणारे ब्रह्मकमळ रात्री उमलायला सुरुवात होते आणि मध्यरात्री पूर्ण उमलते नि दुसऱ्या दिवशी सकाळी कोमेजते. या फुलाभोवती भिरभिरणारे कीटक, रंगबेरंगी फुलपाखरे पाहण्यात एक वेगळीच मौज! श्रावणात खरी गंमत असते ती डोलणारी गवतफुले पाहण्याची. इंदिरा संत या गवतफुलाचे वर्णन करताना लिहितात -
हिरवी नाजूक रेशीम पाती,
दोन बाजूला सळसळती,
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
वाऱ्याच्या लयीवर माना डोलवणारी विविध रंगांची गवतफुले पाहताना भान हरपून जाते आणि म्हणून इंदिराबाई अलवारपणे लिहितात -
पाहून तुजला हरवून गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
गवतफुला रे, गवतफुला
ही कविता जेव्हा जेव्हा आपण चालीत म्हणतो तेव्हा जाणवते या कवितेची लय जणू इंदिराबाईंना उघड्या माळरानावर वाऱ्याच्या दिशेने एका लयीत डोलणाऱ्या गवतफुलांमध्येच जणू सापडली असावी इतकी त्या कवितेची लय सहजसुंदर आहे.
फुलांचा मंदसर दरवळणारा गंध, पक्ष्यांची
स्वरमयी गाणी आणि संथ पावसाच्या सरींमधून
झिरपणारा एक अलौकिक शांतपणा... हे सगळं श्रावणाच्या निसर्गाचं वैभव!शेतांमध्ये उभ्या असलेल्या भाताच्या लहरी आणि मोकळ्या आभाळाखाली खेळणारे ढग - हे सगळे मनाला आनंद देणारे असते. श्रावणातला निसर्ग म्हणजे जणू कुणा कुशल चित्रकाराने संथसपणे रंगवलेले एक हृदयस्पर्शी चित्र. अशा निसर्गरम्य वातावरणात चाहूल लागते ती श्रावणातील सणांची!
नागपंचमी, हरितालिका, नारळीपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी आणि या सर्व सणांचे अधिष्ठान असते निसर्गावरच. शेती, पाणी, झाडं, प्राणी आणि आपण - सगळेच एकाच निसर्गचक्राचे भाग. म्हणूनच श्रावणात केवळ निसर्ग पाहायचा नसतो, तर अनुभवायचा असतो. निसर्गाशी माणसाचे असलेले नाते गहिरे करणारे श्रावणातील सणवार... वातावरणात असलेली सात्त्विकता मनालाही लाभावी म्हणूनच की काय सणांचा राजा असलेला हा श्रावण महिना... जिवाशिवाचे प्रतीक असलेल्या शंभू महादेवाचे या महिन्यात एक आगळेवेगळेच महत्त्व. श्रावणी सोमवार अगदी भक्तिभावाने महाराष्ट्रात व भारतभरात साजरा केला जातो. समुद्रमंथनात निर्माण झालेले विष महादेवांनी प्राशन केले आणि मग त्याचा दाह शमवण्यासाठी देवांनी व भक्तांनी त्यांच्यावर पाणी, बेलपत्र व दुधाचा अभिषेक केला. ही घटना श्रावणातील सोमवारी घडली आणि म्हणून मग महादेवांची भक्तिभावाने पूजाअर्चा करून श्रावणात साजरा केला जाणारा श्रावणी सोमवार. आपल्या सणांमागील सगळ्याच कथा, आख्यायिका खरं तर आपल्याला जीवनमूल्य देणाऱ्या असतात. फक्त गरज असते ती उपचारांपलीकडे असणारा मथितार्थ जाणून घेण्याची. महादेवांची प्रार्थना करून जणू भक्त हेच मागणे मागत असतो की जीवनातील वाईट, नकारात्मक अनुभव पचवण्याची मला शक्ती मिळू दे आणि ही नकारात्मक भावभावनांची पुडी रिचवल्यावर माझ्या मनाचा होणारा दाह शांत होऊ दे. माझ्या मनातील रागाचा, संतापाचा, उद्रेकाचा डोह शांत होऊ दे. सात्त्विक मनाची रुजवण करणारा असा हा श्रावणी सोमवार.
खरं तर आषाढी अमावस्येपासूनच मनाला उभारी देणाऱ्या, निसर्गाचे ऋण व्यक्त करणाऱ्या आणि मानवी नातेसंबंध दृढ करणाऱ्या सणांची सुरुवात होते. जीवनातील अंधकारात आशेचे दीप प्रज्वलित करणारी दीप अमावास्या, शेतकऱ्यांच्या शेताला उंदीर-घुशींच्या विध्वंसापासून रक्षण करणाऱ्या नाग - सर्पांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी नागपंचमी, खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून, ज्याच्या पोटातील जीवसृष्टीवर उदरभरण होते त्या समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कोळी बांधवांची नारळीपौर्णिमा, त्या पाठोपाठच बहीण-भावाचे दृढ नाते अधोरेखित करणारे रक्षाबंधन नि एकतेचे, सामूहिक प्रयत्नांची शिकवण देणारी दहीहंडी नि त्यापूर्वी कालियामर्दन करणाऱ्या म्हणजेच दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करणाऱ्या, जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीकृष्णाची जन्माष्टमी नि गौरी - गणपतींचे वेध लावणारा, श्रावण महिन्याच्या अखेरीस येणारा बैलपोळा हा सण देखील कृषी संस्कृतीत योगदान देणाऱ्या प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देतो. श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी मंगळागौर म्हणजे केवळ देवीची आराधना नव्हे तर आपलं मन मोकळं करण्याची हमखास जागा.
पूर्वापार परंपरेने निसर्ग, मानवी भावभावना व मानवी जीवनमूल्य यांची सांगड घालणारे निसर्गरम्य श्रावणातील सण त्यामागील अर्थ जाणून साजरे केल्यास जीवनाला खऱ्या अर्थाने उभारी देतील यात तिळमात्र शंका नाही.
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वापार परंपरेने निसर्ग, मानवी भावभावना व मानवी जीवनमूल्य यांची सांगड घालणारे निसर्गरम्य श्रावणातील सण त्या मागील अर्थ जाणून साजरे केल्यास जीवनाला खऱ्या अर्थाने उभारी देतील यात तिळमात्र शंका नाही. श्रावणाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार होते. श्रावण हा शब्दच जणू ऊर्जा देणारा आहे.