रियाध : सौदी अरेबियाच्या राजघराण्याचे राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद यांचे निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते. लंडनमध्ये २००५ मध्ये झालेल्या कार अपघातामुळे राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद कोमात गेले होते. ते मागील २० वर्षे कोमामध्ये होते. कोमामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद यांच्या मृत्यूमुळे जगण्यासाठी सुरू असलेला एक संघर्ष संपुष्टात आला आहे. ग्लोबल इमाम्स कौन्सिलने प्रसिद्धीपत्रक काढून राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद यांच्या मृत्यूची माहिती दिली तसेच शोक प्रकट केला.
अल्लाहच्या मर्जीने राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद यांचे निधन झाल्याचे त्यांचे वडील राजकुमार खालेद बिन तलाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद हे इंग्लंडची राजधानी लंडन येथे एका महाविद्यालयात शिकत होते. शिकत असतानाच्या काळात एक दिवस उत्साहाच्या भरात राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद हे कार चालवत होते. कार चालवत असताना अपघात झाला. हा अपघात झाल्यापासून राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद कोमामध्ये होते. नंतर त्यांना रियाधमधील किंग अब्दुल अझीझ मेडिकल सिटीमध्ये हलवण्यात आले. तिथे ते २० वर्षे वैद्यकीय देखरेखीखाली लाईफ सपोर्टवर होते. अमेरिकेतील निष्णात डॉक्टरांनी राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद यांना बरे करण्याचे प्रयत्न केले होते. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते.
एप्रिल १९९० मध्ये जन्मलेले राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद हे राजकुमार खालेद बिन तलाल यांचे ज्येष्ठ पुत्र आणि अब्जाधीश उद्योगपती प्रिन्स अलवालीद बिन तलाल यांचे पुतणे होते. प्रदीर्घ काळ कोमात असल्यामुळे राजकुमार अलवालीद बिन खालेद बिन तलाल अल सौद यांचा उल्लेख अनेकजण झोपलेले राजकुमार असा करत होते.