मोबाइलचे वेड

कथा : रमेश तांबे


यली, अगं जेवून घे!” आईने स्वयंपाक घरातून आवाज दिला, पण सायलीला आईचा आवाज ऐकूच आला नाही. कारण ती मोबाइल बघण्यात मग्न होती. आईने पुन्हा दोन वेळा सायली सायली असा आवाज दिला, पण सायलीकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेवटी आईनेच पोह्याची ताटली तिच्या समोर ठेवली. तळलेले शेंगदाणे वर खोबऱ्याचा किस टाकून आईने छान पोहे बनवले होते. सोबत लिंबाची एक फोडदेखील ठेवली होती, पण या साऱ्याकडे दुर्लक्ष करून सायलीचं मोबाइल बघणं सुरू होतं.


दहा-पंधरा मिनिटे यातच गेली. सगळे पोहे थंड झाले. मग “मी नाही खाणार ते थंड पोहे” असे म्हणत सायली दुसऱ्या खोलीत गेली अन् पलंगावर पडून पुन्हा मोबाइल बघू लागली.


सायलीचे हे असे वागणे बघून आईचा पारा चढला. आई तरातरा आतल्या खोलीत गेली अन् सायलीवर ओरडली, “काय गं किती वेळ सांगते आहे, नाष्टा करून घे, पण ऐकायचं नाही. सारखं मोबाइलमध्येच बघत बसायचं. अभ्यास नाही, घरातलं काम नाही.” सायलीला चांगलं बदडून काढलं पाहिजे असंच आईला वाटत होतं, पण तसं तिनं केलं नाही. बराच वेळ बडबडून आई आपली स्वयंपाकघरात निघून गेली.


आई एवढा वेळ सायलीला नको नको ते बोलली, पण तेवढ्या वेळात सायलीने एकदाही फोन खाली ठेवला नाही की मान वर करून आईकडे बघितले नाही. आता मात्र आईने सायलीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. आपण भले आणि आपले काम भले. मग काय सायलीला तर मोकळे रानच मिळाले. कारण घरात सायली आणि आई या दोघीच असायच्या. सायलीचे बाबा कामानिमित्त भारतभर फिरतीवर असायचे.


आता सायली शाळेतदेखील मोबाइल घेऊन जाऊ लागली. दिवस-रात्र मोबईल बघायचं, हेडफोन लावून गाणी ऐकणं, चॅटिंग करणं, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणं, दिवसभर रील बघणं यातच सायलीचा दिवस संपू लागला. यात जवळजवळ पंंधरा दिवस गेले असतील.


रविवारचा दिवस होता. सकाळचे दहा वाजून गेले होते. तरी सायली उठली नव्हती. सायलीचे बाबा रात्रीच घरी आले होते, पण सायलीला मात्र बाबा आल्याचे माहीत नव्हते. साधारण अकराच्या सुमारास सायलीच्या खोलीतून आवाज आला.


“आई गं लवकर इकडे ये” पण आई जागची हलली नाही. जेव्हा सायलीच्या रडण्याचा आवाज आला तसे बाबा धावले. झोपेतून उठून सायली डोळे चोळत बसली होती. बाबांनी विचारले, “काय झालं गं सायली?” तोच सायलीने बाबांना मिठी मारली आणि म्हणाली, “बाबा माझे डोळे खूप दुखतायत. खूप चुरचुरतायत. डोळ्यांतून सारखं पाणी बाहेर येतंय. बघा ना बाबा काय झालं माझ्या डोळ्यांना!”


आता मात्र आई घाबरली. तिने झटकन पुढे येत म्हटले, “बघू दे उघड डोळे!” सायलीचे डोळे चांगले सुजले होते. डोळे तर एवढे लाल झाले होते की जणू त्यात रक्त उतरले होते. डोळ्यांतून सारखे पाणी वाहत होते. आता मात्र सायली आईच्या गळ्यात पडून रडू लागली. “आई गं सांग ना माझ्या डोळ्यांना काय झालंय!” बाबांनी लगेच गाडी काढली आणि डोळ्यांच्या डॉक्टरांकडे सायलीला घेऊन गेले. प्रवासात सायलीने एकदाही डोळे उघडले नाहीत. आईच्या कुशीत शिरून फक्त माझ्या डोळ्यांना काही होणार तर नाही ना असे म्हणत राहिली. आईला माहीत होतं मोबाइलच्या अतिवापराने सायलीचे डोळे लाल झालेत आणि सुजलेसुद्धा! पण आई काहीच बोलली नाही.


गाडी दवाखान्यासमोर उभी राहिली. सायली आईचा हात धरून डोळे न उघडता दवाखान्यात शिरली. डॉक्टरांनी बराच वेळ तिचे डोळे तपासले. नंतर एक गोळी खाण्यासाठी देऊन औषधाचे दोन थेंब डोळ्यांत टाकले. मग डाॅक्टरांनी तिचे डोळे बांधून तिला झोपवले. जवळजवळ दोन तासांनी सायलीच्या डोळ्यांवरची पट्टी काढली गेली. तिने हळूच डोळे उघडले. आता डोळ्यांची चुरचुर थांबली होती. तिने उठून समोरच्या आरशात पाहिले तर डोळ्यांची लालीदेखील कमी झाली होती. मग मुख्य डॉक्टर आले आणि म्हणाले, “काय सायलीताई कशा आहात. झाले का डोळे बरे!” चुरचुर थांबली का? सायलीने मानेनेच होकार दिला.


तेवढ्यात डॉक्टरांनी स्वतःच्या खिशातला एक महागडा मोबाइल बाहेर काढला आणि म्हणाले, “सायली हा घे फोन, माझ्याकडून तुला सप्रेम भेट! यात बघताना तुला खूप मजा येईल. अगं डोळे काय महत्त्वाचे आहेत का? मोबाइल बघणं महत्त्वाचं.” डॉक्टरांचं उपरोधिक बोलणं सायलीला समजत होतं. ती म्हणाली, “आई-बाबा, डॉक्टर काका मला समजलं. माझे डोळे मोबइलच्या अतिवापराने लाल झाले अन् सुजले, पण जेव्हा डोळ्यांना त्रास झाला तेव्हा कळले की डोळे किती महत्त्वाचे आहेत. आई चुकलेच माझे! यापुढे आवश्यकता असेल तेव्हाच मी मोबाइल हातात घेईन.” सायलीचं बोलणं ऐकून आईने तिला जवळ घेतलं. तेव्हा आईच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. कारण तिची लाडकी लेक एका मोठ्या संकटातून वाचली होती.

Comments
Add Comment

डाकिया डाक लाया...

डॉ. साधना कुलकर्णी पत्रव्यवहार हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजूक आणि भावनाप्रधान असा कोपरा असतो. आजही

कविवर्य मंगेश पाडगावकर

कोकणी बाणा : सतीश पाटणकर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले

सामाजिक एकाकीपणा आणि आधुनिक समाज

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या धावपळीच्या युगात, जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेलो आहोत, त्याच वेळी

‘विकत घेतला शाम...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ६५ वर्षांपूर्वी आलेला एक सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. राजाभाऊ

श्रीहरीचा अंश असलेल्या पृथूची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ध्रुवानंतर आठव्या पिढीत अंग नावाचा राजा झाला. त्याच्या पत्नीचे नाव सुनिथा

श्री गणेशाचे स्वरूप

अष्टसिद्धी विनायक तेजोमय चैतन्यरूप  ऊर्जेचा स्रोत अद्भुत ओंकार हे स्वरूप  वरील चार ओळींमधून मी गणेशाचे स्वरूप