इये फोंड्याचिये नगरी : जुन्या आठवणींना उजाळा

पुस्तक परीक्षण : संतोष वायंगणकर


पन्नास वर्षांपूर्वी कोकणात आज अस्तित्वात आणि चर्चेत नसलेल्या बाजारपेठांचा बहराचा काळ होता. कोल्हापूर घाटाच्या पायथ्याशी असलेली अशीच एक फार जुनी बाजारपेठ म्हणजे फोंडाघाटची बाजारपेठ, किराणा आणि पानबाजारासाठी फोंडाघाट गेली अनेक वर्षे प्रसिद्ध आहे.


आजचं फोंडाघाट गावाचे स्वरूप फार देखणं आणि उद्योगी नसलं तरीही पन्नास वर्षांपूर्वी फोंडाघाट गावाला फार मोठं महत्त्व होतं. फोंडाघाट गाव, तिथली वस्ती, त्या काळची दुकाने, फोंडाघाटमधील इरसाल व्यक्ती, आपापसातील स्नेह, दळणवळण, त्याकाळच्या अपुऱ्या; परंतु आनंद देणाऱ्या सोईसुविधा या सर्वांचा धांडोळा रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक आणि फोंडाघाट गावचे सुपुत्र विष्णू गांधी यांनी ‘इये फोंड्याचिये नगरी’ या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी त्यांच्या बालपणी अनुभवलेले, पाहिलेले फोंडाघाट तिथल्या माणसांचं यथार्थ वर्णन केलं आहे.


‘इये फोंड्याचिये नगरी’ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर कोकणचे सुपुत्र थोर साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी विष्णू गांधी यांच्या लेखनाला शुभेच्छा देताना त्यांच्या करूळ गावच्या सीमेलगतच्या फोंडाघाटच्या आठवणीही सांगितल्या आहेत. विष्णू गांधी यांचे हे पुस्तक संपदा वागळे यांनी संपादित केले आहे. गांधी यांच्या या पुस्तकाने साठ वर्षांपूर्वीच्या कोकणची खऱ्या अर्थाने झलक अनुभवायला मिळते. त्या काळातलं जीवनमान, गरिबी, बाजारपेठेतील श्रीमंती आणि माणसांमधला इरसालपणा या सर्वांविषयी फार खुमासदार शैलीत लेखकाने वर्णन केले आहे. रिझर्व्ह बँकेत महाव्यवस्थापक पदावर सेवा केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याला आपल्या गावच्या आठवणी इतक्या अस्वस्थ करतात. त्या जुन्या सर्व आठवणींची मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये केली आहे.


फोंडाघाट बाजारपेठेतील त्या काळातील प्रसिद्ध असलेलं सरदार विश्रांतीगृह त्याचे मालक शांतारामभाऊ नेरूरकर, या विश्रांतीगृहाचे व्यवस्थापक वसंत वायंगणकर (मास्तर) या हॉटेलमधील चहा, भजी, लाडू अशा रूचकर खाद्य पदार्थांची आठवण देतानाच हॉटेलमध्ये भेटलेल्या व्यक्तींविषयीही गांधी आवर्जून वर्णन करतात. विष्णू गांधी यांचे शिक्षक बापूभाई शिरोडकर यांचे शैक्षणिक कर्तृत्व, शिस्त, भाषा, अशा अनेक बाबतीत विष्णू गांधी आदराने सारं काही मांडतानाच बाजारपेठेतील त्यांनी पाहिलेली दाजी सबनीस, सबनीस-मोदी आणि कंपनी अडत दुकानदार, फोंडाघाट पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना चंद्रकांत डोर्ले, वसंत सामंत, गणपत सापळे, भाऊ पटेल, जगन्नाथ मोदी, बाबा नाडकर्णी, आबा गांधी अशा सर्वांनी एकत्र येत ही संस्था स्थापन केल्याचे लेखक आवर्जून सांगतात.


भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू फोंडाघाटच्या देवगड तिठ्यावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळचं सर्व वर्णन वाचताना तो सोहळा प्रत्यक्ष अनुभवल्याचा भास होतो. कोकणात साजऱ्या सणांच्या आठवणींना लेखकाने उजाळा दिला आहे. फोंडाघाटमधील त्याकाळी होणारी नाटकं, टुरिंग टॉकीजमधले कृष्णधवल चित्रपट कसे होते, या टुरिंग टॉकीज कशा असायच्या, चित्रपट पाहायची गर्दी कशी व्हायची याचं छान वर्णन त्यांनी केले आहे. फोंडाघाटमध्ये भजनी मेळे आणि कीर्तनाचा फार पूर्वी देखील फोंडाघाटवासीय कसे आनंद घ्यायचे हे सांगताना विष्णू गांधी यांनी दाभोळकर बुवा, कसालचे तावडेबुवा, कणकवलीचे रघू कोरगांवकर, हजारे बुवा यांचे भजनांचे मेळे कसे भरायचे हे सांगितले आहे.


लेखकाने त्याकाळी प्रवासी वाहतूक करणारे हाफटनी सर्व्हिस मोटारी नंतरच्या काळातील एसटी बसेस या गाड्यांचे एसटी स्टँड कसे बदलत गेले आणि त्याबरोबरच फोंडाघाटमधील हॉटेल आदी व्यवसायाचे स्वरूप कसे बदलले हे सांगताना सरदार विश्रांतीगृहाच्या दुसऱ्या भागात जागा बदलल्याने हे भरभराटीला असलेले हॉटेल चालेनासे झाले. सरदार विश्रांतीगृह हे त्याकाळचे हॉटेल अगदी अलीकडेपर्यंत चालविले होते. अलीकडे ते बंदही पडले. साठ वर्षांपूर्वीच्या फोंडाघाट गावच्या जुन्या आठवणी ‘इये फोंड्याचिये नगरी’ या पुस्तकातून विष्णू गांधी यांनी सहज सुंदर शब्दांत उलगडल्या आहेत.

Comments
Add Comment

अफजलखान वध : इतिहासातील सोनेरी पान

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या

लिटिल मास्टर सुनील गावसकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर सुनील मनोहर गावसकर. वेंगुर्ले उभादांडा हे त्यांचे गाव. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न

हम्पी म्हणजे : दगडात कोरलेली विजयनगर साम्राज्याची वैभवगाथा

विशेष : लता गुठे आपण देश-विदेशात फिरत राहतो तेव्हा अनेक शहरं आपल्याला आवडतात पण नजरेत भरणारं आणि मनात कायम

आखिरी गीत मोहब्बतका सुना लूं तो चलूं

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे नोव्हेंबर महिन्यातला सोमवार आला तो एक अतिशय वाईट बातमी घेऊनच. आठच दिवसांपूर्वी

उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे

मालकाचे घर, दादागिरी भाडोत्रीची

क्राइम : अॅड. रिया करंजकर शहरामध्ये नोकरीची आणि उद्योगधंद्याची मुबलकता असल्यामुळे ग्रामीण भागातील युवक शहराकडे