
मुंबई : ऑस्ट्रेलियातील ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली. विशेष बाब म्हणजे भारताने सर्व देशांमधून सातवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ११० देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ६३० विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये ६९ मुलींचा समावेश होता.
यंदा ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे १० ते २० जुलै या कालावधीत ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचे (आयएमओ २०२५) आयोजन करण्यात आले होते. सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघामध्ये दिल्लीतील कणव तलवार,आरव गुप्ता आणि महाराष्ट्रातील आदित्य मांगुडी वेंकट गणेश यांनी ‘सुवर्ण पदक’ पटकावले. कर्नाटकमधील एबेल जॉर्ज मॅथ्यू व दिल्लीतील आदिश जैन यांनी ‘रौप्य पदक’ आणि दिल्लीतील अर्चित मानस याने ‘कांस्य पदक’ पटकावले. या भारतीय संघाचे नेतृत्व दिल्लीतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या प्रा. शांता लैशराम आणि सहनेतृत्व बंगळुरूतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. मैनक घोष यांनी केले. तर अतुल शतावर्त नादिग आणि डॉ. रिजुल सैनी यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
दरम्यान, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, ही गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, यासह विविध विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे नोडल केंद्र आहे.