भारतीय संगीत म्हणजे अध्यात्मिक स्वरयात्रा

  55

ठेवा संस्कृतीचा : लता गुठे


भारतीय संस्कृती हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे भारतीय लोककलांवर आधारित विविध विषयांवर अनेक लेख लिहिले. त्याचबरोबर ज्यातून आपल्या संस्कृतीची उज्ज्वल परंपरा आणि ओळख निर्माण झाली त्याविषयी अनेक कलांच्या मुळाशी जाऊन त्या कलांचा अभ्यास केला. संगीत हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. संगीत कळो अथवा न कळो; परंतु संगीत ऐकायला सर्वांनाच आवडते. कारण ते ऐकताना मनाला आनंद होतो. ‌ या लेखांमधून भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख करून देत आहे.


भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ही परंपरा अनुभवसिद्ध आणि गुढ आहे. या कलेच्या अंगी वाङ्मय, कला, तत्त्वज्ञान, धर्म आणि अध्यात्म यांचा संगम आढळतो. या परंपरेत संगीताला एक विशेष स्थान आहे. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, भारतीय संगीत हे साधना, आराधना आणि आत्मोन्नतीचे माध्यम मानले गेले आहे. या संगीताचे मूळ म्हणजेच ‘भारतीय शास्त्रीय संगीत’


भारतीय शास्त्रीय संगीताची मुळे वैदिक संस्कृतीत खोलवर रुजलेली आढळतात. सामवेदात वर्णन केलेली ऋचांची गायनशैली हे भारतीय संगीताचे आद्यरूप मानले जाते. नाद आणि स्वर यांची चेतना त्यामध्ये दिसते. ‘नाद ब्रह्म’ ही संकल्पना हेच दर्शवते की नाद म्हणजे साक्षात् ब्रह्म-जो जगाचे आद्यतत्त्व आहे. या तत्त्वाचे आदिरूप विश्वाच्या विवारातून ओमकराचा ध्वनी निर्माण झाला ते आहे असं म्हटलं जातं. ‌भारतीय संगीताचा गाभा तोच आहे असं मला वाटतं, कारण त्यानंतर पवित्र स्वराने सकारात्मक दिव्य शक्ती व्यापलेली आहे आणि त्यातून निर्माण झाले ते शास्त्रीय संगीत.


यानंतर विचार येतो तो निसर्गाच्या अनेक घटनांमधून निर्माण होणारे संगीत. उदा... पाऊस, वारा, नदी, सागराची गाज, पक्षी या सर्वांच्या ठिकाणी संगीत आहे. यांच्यापासून पुढे वाद्य संगीत निर्माण झाले. शंखनाद, बासरी, डमरू, वीणा या वाद्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. कोणत्याही संगीतामध्ये वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाद्याशिवाय संगीत कला अपूर्ण आहे.


शास्त्रीय संगीताचे दोन मुख्य प्रवाह पाहायला मिळतात. ते म्हणजे, हिंदुस्थानी संगीत (उत्तर भारतातील शैली) आणि कर्नाटकी संगीत (दक्षिण भारतातील शैली). दोन्ही प्रणाल्यांमध्ये अनेक साम्यस्थळे असूनही त्यांच्या अभिव्यक्तीच्या शैली, रचनातंत्र, तालप्रणाली आणि रागांचा विकास यामध्ये वैविध्य आहे.


संगीत ही साधना-स्वर, राग आणि ताल हे संगीताचे स्थायीभाव आहेत. भारतीय संगीताचा पाया म्हणजे सप्तस्वर-सा, रे, ग, म, प, ध, नी. या सात स्वरांमध्येच संपूर्ण रागसंगीत घडते. प्रत्येक स्वर एक विशिष्ट भाव, रंग आणि ऊर्जा वाहून आणतो. हिंदुस्थानी संगीतामध्ये रागांची निर्मिती ही ‘थाट’ पद्धतीवर आधारित असते. प्रत्येक राग हा एका विशिष्ट वेळेस गायला जातो, कारण प्रत्येक रागाचे भाव आणि नाद विशिष्ट कालखंडात प्रभावी असतात.


राग हा केवळ स्वरांची एक मांडणी नाही, तर ते एक जिवंत भावविश्व आहे. तो एक अनुभव आहे, एक कथा आहे, जिचा आरंभ एका सुरावटीने होतो आणि उत्कर्ष अालाप, तान, आणि बंदिशीतून साधला जातो. एक राग जेव्हा गायला जातो, तेव्हा तो श्रोत्याच्या मनात भावना, स्मृती, रंग, ऋतू किंवा अगदी काळाचीही जाणीव निर्माण करतो.


ताल ही संगीताची गती आहे. जशी शरीरासाठी श्वास, तशी संगीतासाठी ताल. विविध तालांनी संगीत अधिक सजीव बनते – त्रिताल, झपताल, एकताल, दादरा, केहरवा अशा असंख्य तालसंकल्पनांनी भारतीय संगीत विकास पावले.


भारतीय शास्त्रीय संगीतात वाद्यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. तंतूवाद्य, वातवाद्य आणि अवनद्ध वाद्य या तीन प्रकारांत भारतीय वाद्यवृंद विभागले आहेत ते‌ म्हणजे, तंतूवाद्यामध्ये वीणा, सितार, सरोद, सुरबहार याचा समावेश होतो. दुसरा प्रकार आहे, वातवाद्ये-बासरी, शहनाई ही वाद्य या प्रकारात येतात आणि तिसरा प्रकार आहे, अवनद्ध वाद्ये-तबला, पखवाज, मृदंग, मृदंगम ही वाद्य या प्रकारात येतात. यानंतर संतूर, सारंगी, जलतरंग, घंटा, हर्मोनियम ही देखील भारतीय संगीतातील महत्त्वाचे वाद्ये आहेत. वाद्यसंगीतातूनही रागाची सौंदर्यपूर्ण मांडणी केली जाते.


भारतीय शास्त्रीय संगीताचा घनिष्ठ संबंध नृत्यशास्त्राशी येतो. यामध्ये भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मणिपुरी या नृत्यप्रकारांमध्ये संगीताची लय, ताल आणि भाव यांचा अद्वितीय संगम दिसतो.


नाट्यशास्त्र, संगीतरत्नाकर, अभिनयदर्पण या ग्रंथांमधून संगीत आणि नृत्य यांचा समन्वय स्पष्ट होतो. नृत्य हे दृश्य अभिव्यक्ती आहे, तर संगीत हे श्राव्य. पण दोघेही आत्म्याशी नाते जोडतात.


भारतीय संगीत हे केवळ कलात्मक आनंदासाठी नसून, ते अध्यात्मिक उन्नतीसाठीही साधन आहे. ‘संगीत साधनायोग्यम्’ असे प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटले आहे. अनेक संतांनी, योग्यांनी, साधूंनी संगीताचा उपयोग ध्यानधारणा, नामस्मरण आणि भावविभोरतेसाठी केला आहे.


संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मीराबाई, संत कबीर, तुळशीदास अशा संत कवींनी संगीताच्या माध्यमातून भजन, अभंग, कीर्तन, पद यांच्याद्वारे समाजामध्ये अध्यात्मिक उन्नती साधली.


आज शास्त्रीय संगीताचा प्रवास परंपरेच्या जोपासनेपासून ते नवनवीन प्रयोगांपर्यंत विस्तारित झाला आहे. अनेक तरुण कलाकार आजही या परंपरेला पुढे नेत आहेत. फ्युजन, जुगलबंदी, शास्त्रीय पॉप, अर्धशास्त्रीय, चित्रपट संगीतामध्ये शास्त्रीयतेचा भास, ही सर्व आधुनिक स्वरूपे शास्त्रीय संगीताच्या मुळांना अजून बळकट करतात.


शास्त्रीय संगीतात आवर्जून नावे घ्यावीत असे पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, डॉ. बालमुरलीकृष्णा, एम. एस. सुब्बलक्ष्मी यांसारख्या दिग्गज गायकांनी शास्त्रीय संगीताला जनमानसात पोहोचवले.


भारतीय शास्त्रीय संगीताकडे जगभरात आदराने पाहिले जाते. याचे कारण म्हणजे, शास्त्रशुद्ध तंत्र, भावना, रागदारी, तालप्रणाली ही आश्चर्यकारक आहेत. पाश्चिमात्य संगीतातील ‘स्केल’ ही संकल्पना इथेओ ‘राग’च्या संवेदनशील मांडणीत परावर्तित होते. त्यामुळे भारतीय संगीत हे केवळ संगीत न राहता ते ‘अनुभव’ बनते.


भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे केवळ सूर, राग, ताल नव्हे, तर तो मनापासून आत्म्यापर्यंतचा एक प्रवास आहे. हा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो, पण त्याचा गाभा एकच तो म्हणजे, भावना आणि अनुभवाद्वारे मंत्रासारखा भासतो. ज्यांनी त्याला आत्मसात केलं, त्यांचं संपूर्ण आयुष्यच स्वरमय होतं.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले