“हम तेरे शहर में आये है...!”

  23

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


गावाच्या यात्रेतून परत आल्यावर एका शायरने आपल्या वहीत काय लिहून ठेवावे? त्याने लिहून ठेवलेला एक शेर असा होता–
“घर लौटके रोएँगे माँ बाप अकेले में,
मिट्टी के खिलौने भी सस्ते नही थे मेले में.”


त्या संवेदनशील, हळव्या कवीचे नाव होते काजी सैयद जुबैर अहमद जाफरी. दि. १४ सप्टेंबर १९२६ ला नजरगंज, इलाहाबाद (उत्तर प्रदेश)मध्ये जन्मलेले श्री. काजी जाफरी, उर्दू साहित्यात विख्यात होते ते (कैसर-उल जाफरी’ या टोपणनावाने! उर्दू, फारसी आणि अरबी भाषा शिकलेले कैसरसाहेब १९४९ साली मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले. आजही उर्दू साहित्यात त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.


अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या या शायरच्या काव्यावर उर्दूत संशोधनही झाले. त्यांच्या काव्यसंग्रहात ‘संग-आशना’, ‘दश्त-ए-बे-तमन्ना’, ‘रंग-ए-हिना’, ‘नबूवतके चराग’, ‘चराग-ए-हरम’ आणि ‘अगर दरिया मिला होता’ हे विशेष लोकप्रिय झालेले आहेत.


त्यांच्या गझलांच्या एकेका शेरमधून त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य जाणवते. गुलाम अलींनी गायलेल्या त्यांच्या दुसऱ्या एका गझलेत ते म्हणतात, ‘माझे घर उदास एकटेपण घेऊन उभे असते. सायंकाळ झाली की त्याच्याभोवती आठवणी फेर धरू लागतात. माझ्या मनात आठवणींची जणू जत्राच भरते’-
‘दुनियाभरकी यादें हमसे मिलने आती है.
शाम ढले इस सूने घरमें मेला लगता है.’


निघून गेलेल्या प्रेमिकेच्या आठवणीत कवी इतका दु:खी आहे की, त्याला समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती तिच्यासारखीच वाटू लागते. त्याला तीच परत येत असल्याचा भास होत राहतो. ‘पारसमणी’मध्ये असद भोपालींनी रफीसाहेबांच्या आवाजातल्या ‘वो जब याद आये बहुत याद आये’मध्ये हीच भावना वक्त केली होती.


‘कई बार ऐसा भी धोका हुवा है,
चले आ रहे हैं वो नजरे झुकाये,
वो जब याद आये बहुत याद आये’
...आणि होतेच ना असे! आशा अमर असते. सगळे संपले असूनही प्रेमिकाच्या मनात आशेची ज्योत तेवतच असते. असद भोपालींच्या त्याच भावनेला वेगळ्या शब्दात मांडताना कैसरसाहेब म्हणतात-


‘आँखों को भी ले डूबा ये दिलका पागल-पन,
आते जाते जो मिलता है तुमसा लगता है.’
खरेतर कवी तिचे शहर सोडून गेला आहे, पण खोलवर रुजलेले प्रेम गाव सोडल्याने थोडेच विसरले जाते? एखाद्या ओल्या जखमेसारखे घळाघळा वाहतच राहते. त्यामुळे त्याला वाटते, एकदा तिला ‘तू असे का केलेस?’ हे विचारूनच टाकावे. ‘मनापासून प्रेम तर तूही केले होतेस ना? मग ते स्वत:च का संपवून टाकलेस?’ माझी अशी काय चूक झाली? हा त्याचा प्रांजळ प्रश्न आहे.


हाही टप्पा प्रेमात अनेकदा येतो. दोघेही प्रेमात पूर्ण बुडालेले असतात दोघांनीही मिलनाची स्वप्ने पाहिलेली असतात आणि अचानक एकजण माघार घेतो, तेही दुसऱ्याला काहीच न कळवता! यावर कवी म्हणतो, ‘इतके झाले तरी माझी काहीही तक्रार नाही. फक्त माझ्या एकदोन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देशील?


तो पुन्हा तिच्या गावात आला आहे ते फक्त यासाठीच. मनाचे समाधान करून घेण्यासाठीच! एकदाच तिचा खुलासा मागण्यासाठी. तो इतक्या हळव्या मनाचा आहे की स्वत:च हेही सूचित करतो, ‘काळजी करू नकोस, मी लगेच निघून जाणार आहे. मी आलोय ते फक्त एका दिवसासाठी-


‘हम तेरे शहर में आए है मुसाफिरकी तरह,
सिर्फ इकबार मुलाकातका मौका दे दे...’


आपल्यातले प्रेम संपल्यावर, शेवटचे संभाषण पार पडल्यावर कुठे जायचे तेही मला माहित नाही, माझ्यापुढे काहीही ध्येय नाही. निदान शेवटच्या निरोपानंतर कुठे जायचे तेवढे ठरवण्यासाठी तरी मला एका रात्रीची मोहलत दे-


‘मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ,
सुबहतक तुझसे बिछड़कर, मुझे जाना है कहाँ?
सोचने के लिए इक रात का मौका दे दे,
हम तेरे शहर में आए है मुसाफिरकी तरह...’


या गझलेला दिलेले संगीत इतकी हुरहूर लावते की जेव्हा “हम तेरे शहर में आये हैं...” ही ओळ पुन्हा पुन्हा येते तेव्हा श्रोत्याला गलबलून येते. असे रसिकाला आपल्या भावनांशी एकरूप करण्याचे सामर्थ्य केवळ काही कवींमध्ये आणि काही संगीतकारांमध्येच असते. प्रत्येक ओळीनंतर कवीच्या अगतिकतेची, त्याच्या भंगलेल्या हृदयाची विषण्णता आपल्याला घेरू लागते.


तो प्रेयसीला म्हणतो, ‘मी मनातल्या क्षीण झालेल्या आशेचे काजवे डोळ्यांत लपवून ठेवले आहेत. काजव्यासारखी माझी आशा क्षणात जागी होते, तर क्षणात मिटते. निराशेची खात्री असल्याने माझ्या पापण्यांवर अश्रूंचे थेंबही सतत चमकत राहतात. एकदा त्या अश्रूंना निदान मनमोकळे वाहण्याची तरी संधी दे...
‘अपनी आंखों में छुपा रक्खे हैं जुगनू मैंने,
अपनी पलकों पे सजा रक्खे हैं आंसू मैंने,
मेरी आंखों को भी बरसात का मौका दे दे,
हम तेरे शहर में आए है मुसाफिरकी तरह...’


आज तू माझ्या प्रेमाची तक्रार ऐकून तर घे, पुन्हा एकदा तुझा नकारच येईल या भीतीने थरथरणाऱ्या ओठांची वेदना समजावून तर घे. मला निदान माझ्या भावना तुझ्यासमोर उघड करण्याची संधी दे. मी फक्त आजच्या अंतिम भेटीसाठीच तुझ्या गावात आलोय. उद्या मी जाणारच आहे ना?
‘आज की रात मेरा दर्द-ऐ-मोहब्बत सुन ले,
कंप-कंपाते हुए होठों की शिकायत सुन ले,
आज इजहार-ऐ-खयालातका मौका दे दे,
हम तेरे शहर में आए है मुसाफिरकी तरह,
सिर्फ इकबार मुलाकातका मौका दे दे...’


शेवटी कवीला सर्वात जास्त अस्वस्थ करणारा प्रश्न ओठावर येतोच. तो म्हणतो, जर मला विसरायचेच होते तर प्रेमाचे नाते जोडलेस तरी कशाला? माझी प्रतारणाच करायची होती तर प्रेम केलेस तरी कशाला? मला हे अगदी दोन-तीनच प्रश्न विचारण्याची एकदा संधी दे-


‘भूलना ही था तो ये इकरार किया ही क्यूँ था,
बेवफा तुने मुझे प्यार किया ही क्यूँ था,
सिर्फ दो-चार सवालातका मौका दे दे,
हम तेरे शहर में आए है मुसाफिरकी तरह,
सिर्फ इकबार मुलाकातका मौका दे दे...’


तसा कोणताही शेवटचा निरोप जीवघेणाच असतो, मग तो कुणाचाही असो. पण भंगलेल्या हृदयाने आपली अगतिकता जाहीर करून केलेली प्रांजळ विचारणा किती भेदक असते! प्रामाणिक प्रेमाची याचना किती अस्वस्थ करून सोडते!

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले