उपमन्यूची गुरुनिष्ठा

  31

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


धौम्य ऋषींना खूप शिष्य होते. एके दिवशी एक दांडगा दिसणारा मुलगा धौम्य ऋषींच्या आश्रमात आला. तो चिखल आणि धुळीने माखला होता. त्याचे नाव उपमन्यू होते. त्याने ऋषींना विनंती केली की, ऋषींनी माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. ऋषींनी त्याचा स्वीकार केला व त्याला इतर मुलांबरोबर ठेवले. विद्यार्थ्यांपाशी असायला पाहिजेत अशा अनेक सद्गुणांची उपमन्यूपाशी वाणच होती. पहिली गोष्ट म्हणजे शास्त्राभ्यास करण्यात त्याला रसच नव्हता. कारण ती शास्त्रे त्याला अवघड वाटत. तो जरा मंदगती असल्याने पाठांतरही करू शकत नसे. तो आज्ञाधारकही नव्हता.


धौम्य ऋषी हे साक्षात्कारी महापुरुष होते आणि खऱ्या अर्थाने गुरू होते. या मुलाशी कसे वागावे हे त्यांना माहीत होते. त्या मुलामध्ये अनेक उणीवा आणि दोष होते तरीसुद्धा ऋषी त्याच्यावर इतर सर्व शिष्यापेक्षा अधिक प्रेम करत होते. उपमन्यूला आपल्या गुरूंकडून इतके अलोट प्रेम मिळाले की लवकरच तोही गुरूंवर प्रेम करू लागला, हळूहळू उपमन्यूचे गुरूंविषयींचे प्रेम इतके वाढले की तो आपल्या गुरूंसाठी काहीही करायला तयार राहू लागला. धौम्य ऋषींच्या ते लक्षात आले. बीजारोपणासाठी जमीन तयार झाली आहे हे त्यांना जाणवले. उपमन्यूच्या दोषांचे एकमेव कारण म्हणजे त्याचा खादाडपणा हेच होते. त्यामुळेच तो मंद झाला होता, त्याची प्रकृती रोगट झाली होती आणि त्याचा तमोगुणही वृद्धिंगत झाला होता, धौम्य ऋषींची इच्छा होती की उपमन्यूने आपली जीभ आवरावी आणि शरीराला आवश्यक तेवढेच खावे.


मग त्यांनी उपमन्यूला सकाळी अगदी लवकर गाई चरायला घेऊन जायला सांगितले आणि तिन्हीसांजा (सायंकाळ) झाल्या की परत माघारी फिरायचे अशी त्यांनी आज्ञा केली, धौम्य ऋषींची पत्नी दुपारच्या जेवणासाठी त्याला शिदोरी बांधून देत असे, पण उपमन्यू फारच खादाड होता. त्याला दिलेले अन्न पुरत नसे, म्हणून जेव्हा भूक लागेल तेव्हा तो गाईंचे दूध काढून पीत असे. उपमन्यूच्या अंगावरील मेद अजिबात कमी झालेला नाही हे धौम्य ऋषींच्या लक्षात आले. त्यांना खूपच आश्चर्य वाटले. त्यांनी जेव्हा उपमन्यूजवळच त्याच्या आहाराबाबतची चौकशी केली तेव्हा, उपमन्यू हा सत्य बोलणारा असल्याने, उपमन्यू काय करत होता ते त्यांना समजले. तेव्हा धौम्य ऋषींनी त्याला सांगितले की, गाईचे दूध उपमन्यूच्या मालकीचे नाही. त्यामुळे गुरूच्या परवानगीशिवाय त्याने दूध पिऊ नये. उपमन्यूचे आपल्या गुरूंवर इतके प्रेम होते की, तो त्यांची आज्ञा पाळायला आनंदाने तयार झाला. पण उपमन्यूला काही त्याची भूक आवरता आली नाही. दुपारी जेव्हा वासरे दूध पीत तेव्हा त्यांच्या तोंडातून जे दूध गळे ते ओंजळीत घेऊन ते तो पिऊ लागला. त्याला असे वाटले की, त्यामुळे गुरूंचा आज्ञाभंग होत नाही, कारण तो स्वत: काही गाईचे दूध काढीत नव्हता. काही दिवसांनंतर धौम्य ऋषींच्या लक्षात आले की, अजूनही उपमन्यूच्या वजनात काहीही फरक पडलेला नाही आणि त्याचे कारणही त्यांना समजले. त्यांनी अत्यंत प्रेमाने उपमन्यूला समजावून सांगितले की, अशा तऱ्हेने वासरांच्या तोंडातून गळणारे दूध पिणे ही वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड होईल. उपमन्यूने पुन्हा तसे न करण्याचे वचन गुरूजींना दिले.


पण एके दिवशी उपमन्यूला दुपारी इतकी भूक लागली की, त्याला काही भूक आवरेना. त्यामुळे तेथील झाडांच्या फांद्यांवर लटकत असलेली काही फळे त्याने खाल्ली. ती फळे विषारी असल्याने त्याला अंधत्व आले. दिसत नसल्याने उपमन्यू एका विहिरीत पडला, खूप वेळ झाला तरी मुलगा परत आला नाही आणि गाई परत आल्या, हे पाहून धौम्य ऋषी त्याला शोधावयास गेले. त्याला विहिरीत पडलेला पाहून ऋषी करुणेने हेलावून गेले. त्यांनी त्याला एक मंत्र शिकविला. तो जपल्याबरोबर देवांचे वैद्य अश्विनीकुमार प्रकट झाले आणि त्यांनी त्या मुलाची दृष्टी त्याला परत मिळवून दिली.


त्यानंतर लोभामुळे कसा घात होतो व सर्वनाश ओढावतो हे उपमन्यूला कळून चुकले. लोभामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक अंधत्वही त्याला कसे प्राप्त झाले हे धौम्य ऋषींनी त्याला समजावून सांगितले. लोभामुळे त्याची बुद्धी जड झाली, त्यामुळे विहिरीत पडून तो संकटात सापडला. कदाचित अधिक धोका होऊन त्याला मृत्यूही आला असता. गुरूजींनी दिलेला हा पाठ उपमन्यूला चांगलाच पटला आणि त्याने ताबडतोब जास्त खाणे सोडून दिले. थोड्या काळातच तो एकदम तंदुरुस्त, निकोप आणि बुद्धिमान झाला.


अशा तऱ्हेने गुरू ब्रह्मा-सृष्टिकर्ता, विष्णू-रक्षणकर्ता व महेश्वर-संहारकर्ता यांची भूमिका करतात. धौम्यऋषींनी- गुरूनी त्या बालकाच्या-उपमन्यूच्या हृदयात गुरूविषयी प्रेम उत्पन्न केले, प्रेमळ उपदेशाने ते जतन केले आणि त्या बालकाच्या यशाआड येणाऱ्या दुष्ट सवयींचा नाश केला.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले