Monday, August 4, 2025

गीताई ... संस्कार गाथा

गीताई ... संस्कार गाथा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


ताई माऊली माझी
तिचा मी बाळ नेणता
पडता झडता घेई उचलुनी खांद्यावरी...


विनोबांची बालगीता म्हणजे गीताई. खरं तर संस्कार वयामध्ये घडणं आणि बिघडणं असतं. मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अगदी तसंच! पहिले गुरू आई-वडील! मग गुरुवर्य ! स्वतःपेक्षा आपल्यावर लक्ष केंद्रित करतात ते. या चिमुकल्यांना घडवतात. घर, घरातील लहानथोर सारे. तसे सारे कसे त्या परिघाभोवती असतात. केंद्रस्थानी असतात ती मुलं. त्यांचे लाड, कौतुक, प्रोत्साहन, प्रेरणा, काळजी, संस्कार यावर आपण लक्ष केंद्रित करत असतो. म्हणून त्या वयामध्येच त्यांना समजून उमजून सांगितले, संगोपन केले जावे. असे संस्कार दिले तर निश्चितच मुलं घडतात. व्यक्तिमत्त्व तसेच त्यांचे भविष्य घडतं.

रोज नव्या बालमनावर नवे विचार कोरले जातात. यालाच तर संस्कारक्षम वय म्हणतात. यावेळी फुलता फुलता, सहज डुलता डुलता, खेळता खेळता मुलांची जडणघडण होत असते. खेळ, गप्पा, गोष्टी, गमती, कोडी, गाणी, अंगाई त्याच पद्धतीने त्या वयामध्ये आमच्यावर देखील गीताईचे संस्कार झाले. गीताईचे वाचन व्हायचे. आईचा आजीचा रामनामाचा जप असायचा. आजी थोडावेळ तरी मला गोष्ट सांगायची आणि तेव्हाच ती गीताईविषयी रोज सांगत असे. मग मलाही गीताईचे वेड लागले. मनाचे श्लोक, रामायण, महाभारतातील गोष्टी, श्यामची आई आणि आचार्य विनोबा भावे यांच्या गीताईने आम्हाला घडवलं. जगात वागावे कसे? ज्ञान व भान दिले. मी पणा, अहंभाव बाळगू नये.


मुलांसाठी तर खूप सुंदर, सहज, सोपी आणि रुचकर असलेली सर्वांना समजेल अशी ही गीताई आहे. यामध्ये उपयुक्त सुसंस्कारी, उपदेशक, तर आहेच; परंतु मूल्य, निष्ठा आणि श्रद्धा जागविणारी देखील आहे. ‘मी मोठा’ हा अहंभाव जागीच ठेचला पाहिजे. सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून कसे वागावे? कोणाचा मत्सर करू नये, ईर्ष्या करू नये, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला कमी लेखू नये, मारहाण करू नये, कोणाचे मन दुखवू नये. मन दुखवण्याचे पातक सर्वांत महत्त्वाचे आणि घातक असते.


आपण या पृथ्वीतलावर माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि आपल्यापासून समाज बनला आहे. समाज हा सेवाभावी असला तरी सुद्धा आपणही लोकांची सेवा करावी. कोणालाही मारहाण करू नये. कोणाचे मन दुखवू नये. सरळ बसावे. सरळ चालावे. सरळ बोलावे. प्रत्येक गोष्टीत आपण आपला स्वार्थ न पाहता जगाच्या सेवेसाठी आपले जीवन, आपला देह झिजवावा. काही ना काही श्रम करतच राहावे. वडीलधाऱ्यांची सेवा करावी.


भयाच्या प्रसंगी देवाचे नामस्मरण करावे. जरुरीनुसार दुसऱ्यास सहकार्य करावे. आपल्या हातून होणाऱ्या चुका टाळाव्यात. दैनंदिन जीवनात आपण कसे वागावे हे लहानांना कळत नाही आणि ते समजण्यासाठी आपल्याला गीताई हा मार्गदर्शक ग्रंथ ठरू शकतो. सोपी भाषा, सोपं बोलणं, लिहिणं. मग गांधी, आ. विनोबाजी, साने गुरुजी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी विद्यार्थ्यांसाठी जीवन शैलीचा आलेखच करून दिलेला आहे. म. गांधीजींची तीन माकडे अतिसुंदर संदेश देतात, चांगले बघा, चांगले बोला आणि चांगले ऐका! असे शिकवतात. तसे साने गुरुजींच्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान उमगत जाते.


रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा निसर्गात शाळा असावी. निसर्ग हाच खरा गुरू. असे बालमनासाठी पोषक वैज्ञानिक मत मांडले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या एका सभेत विनोबाजी बोलून गेले. शिक्षकांनी विद्यार्थी परायण असावे. विद्यार्थ्यांनी ज्ञान परायण व्हावे आणि ज्ञान सेवा परायण राहावे. खरेच आचार्यांच्या मते किती काळ शिकावे, तर शिकण्याची शक्ती असेल तोपर्यंत कायम. निरंतर शिकतच राहावे. रोज स्नान केल्याने शरीर स्वच्छ होते.


स्वच्छतेने मन प्रसन्न होते आणि म्हणून मग अभ्यास करण्याची इच्छा होते. जगणे आणि शिकणे यांना एकमेकांपासून वेगळे करू नये. जगता जगता शिकावे आणि शिकत शिकत जगावे. यामध्ये स्वावलंबन, श्रम, साधना, सेवा, भक्ती, कर्मज्ञान, त्याग, परोपकार, चांगले वागणे, सुस्वभाव, स्वयंशिस्त, अभ्यास, वाचन, ग्रंथावर आणि मग गुणसंपदा वैचारिक प्रगल्भतेला प्रगल्भ करणारी आहे. विवेकी महत्त्वपूर्ण आणि अतिशय वाचनीय अशी ही गीताई आजच्या पिढीची गरज आहे.


प्रत्येकाने वाचावी. आमच्या शालेय जीवनामध्ये याच्या स्पर्धा असायच्या. गीताई आणि मनाचे श्लोक सक्तीचे, अभ्यासाचा एक भाग परिपाठ होते. त्यामुळे आम्ही घडलो. ग्रंथप्रेम, ग्रंथ साधना आणि वाचनाचे वेड निर्माण झाले. मराठी साहित्य संस्कृती जपण्यासाठी असं हे जुनं ते सोनं अत्यंत अनमोल आहे.

Comments
Add Comment