
काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे-खारकर
प्रत्येक माणसाला त्याच्या जन्मानंतर ८/१० दिवसांत एक हक्काचे नाव मिळते. मग तो लखपतीचा मुलगा असो की एखाद्या भिकाऱ्याचा! बबलू हा दोन अडीच वर्षांचा असताना तो वांद्र्याला रेल्वे स्टेशनवर हरवला. पोलिसांनी अनाथ असल्यामुळे त्यांना चेंबूरच्या अनाथाश्रमात ठेवले. इथे काही दिवस राहिल्यावर त्याची रवानगी लोणावळ्याच्या ‘आंतरभारती बालग्राम’ या निमशासकीय संस्थेत झाली.
बबलूचे १० वीपर्यंतचे आयुष्य चांगले गेले. नुसते ‘बबलू एन. के’ (म्हणजे आडनाव Not Known) वर धकत होते. पण दहावीच्या वर्गात असताना त्याच्या एका शिक्षकांनी त्याला जवळ बोलावून सांगितले, ‘तुझे कागदोपत्री बबलू के. एन. असे नाव लागले आहे. ते बदलून घे. बबलू सरांच्या मागे लागला पण संस्थाचालक हतबल असल्यामुळे ते काहीच करू शकले नाही. एक दिवस ‘नवले’ नावाचे सर तिथे आले. त्याला रडताना बघून म्हणाले, ‘का बाळा, का रडतोस?’ बबलू म्हणाला, ‘सर मला माझे नाव पाहिजे आहे.’ नवले सरांचा एक भाऊ नुकताच वारला होता. ते म्हणाले आजपासून मी तुला नवीन नाव देतो – ‘बबलू बाजीराव नवले.’ अशा तऱ्हेने बबलूला पूर्ण नाव मिळाले.
शाळेत असताना बबलूने पहिला नंबर कधीच सोडला नाही. तो क्रिकेट खेळत असे. ‘इनोसंट हिरो फाऊंडेशन’तर्फे झालेल्या क्रिकेट सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली आणि सर्वाधिक बळी मिळवले. विश्वविजेत्या मुरलीधर मुथय्याकडून त्याला ‘सर्वोत्तम गोलंदाजाचा’ पुरस्कार मिळाला आणि १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यासाठी त्याची निवड झाली. बबलू आनंदात होता पण वय १८ वर्षांखाली असल्याने सामन्यात भाग घेता आला नाही.
१८ वर्षे पूर्ण झाल्यावर सर्व मुलांप्रमाणे त्यालाही आश्रमाबाहेर जाण्यासाठी सांगण्यात आले. अशा स्थितीत त्याने मिळेल ते काम करून आपले शिक्षण सुरू ठेवले. कॉलेजमध्ये ‘कमवा शिका’ योजनेत शिकत असताना त्याला एकदा स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या व्याख्यानाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तो जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. एम. ए. झाल्यावर त्याला त्याच महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली होतीच, मग त्याने मॅकडोनाल्ड कंपनीत काम केले. कारण पगाराबरोबर तिथे रात्रीचे जेवण मिळायचे. त्यावर दिवस काढावा लागे. बी. ए आणि एम. ए. ला तो प्रथम श्रेणीत प्रथम आला. बबलूची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच होती.
पहिल्या वेळी राज्य सेवा आयोगाच्या मुख्य आणि संयुक्त परीक्षेत तो पास झाला, पण अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देता न आल्याने त्याला नोकरी मिळू शकली नाही. बबलूने चेंबूर रेल्वे स्थानकावर ८ दिवस राहून ही कागदपत्रे मिळवली. या सर्व कामाच्या वेळी करोनाची परिस्थिती असल्याने खूप त्रास झाला पण शेवटी त्याने ही कागदपत्रे मिळवली.
बबलूची केस ऐकली तेव्हा अमरावतीच्या पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा प्रदीर्घ काळ सुरु असलेला लढा आठवला.
आज महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो अनाथ मुले मुली १८ वर्षे वय झाल्यामुळे संस्थेबाहेर फेकले जातात. काहीच आधार, ओळख, कागदपत्रे नसलेल्या या देशाच्या भावी नागरिकांचे काय होते याची कुठेही नोंद नाही. मुले मिळाले तार पडेल ते काम करतात. अगदी क्वचितच सन्मार्गी लागतात. नाहीतर गुन्हेगार टपलेलेच असतात. ते अशा मुलांना गुन्हेगारीत ओढतात. मुलींचेही अनेकदा हेच होते. त्यांचे काय होते याचा तर विचारही करवत नाही!