Friday, August 15, 2025

IND vs ENG Test series: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी अंशुल कंबोजचा भारतीय संघात समावेश

IND vs ENG Test series: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी अंशुल कंबोजचा भारतीय संघात समावेश

वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या दुखापतीमुळे अंशुलला बॅकअप म्हणून संघात स्थान


लंडन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.


वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या दुखापतीमुळे अंशुलला बॅकअप म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.  एजबॅस्टन येथे भारतीय संघाच्या ऐतिहासिक कसोटी विजयाचा नायक आकाश दीप दुखापतीतून सावरत असल्याचे म्हटले जात आहे.ज्यामुळे तो मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीला त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ३० वे षटक टाकल्यानंतर आकाश दीप कंबर धरून सावधपणे चालताना
दिसला. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. आकाश थोड्या वेळाने मैदानात परतला खरा, पण त्यानंतर त्याने आणखी षटक टाकले नाही. दिवसअखेर भारतीय संघाने तीन विकेट गमावल्यानंतर तो नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला आणि ११ चेंडू खेळला.  तर दुसरीकडे अर्शदीप सराव करताना झालेल्या बोटाच्या दुखापतीतून अद्याप सावरत आहे. तसेच आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अर्शदीपला अंतिम अकरा क्रिकेटपटूंमध्ये संधी मिळालेली नाही.


इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी कंबोजने इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत ‘अ’ संघासाठी दोन सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये कंबोजने पाच विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतकही झळकावले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत दुखापतींमुळे भारतीय संघाच्या अडचणी निश्चितच वाढल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा