वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा
पोलादपूर : महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर दरडी कोसळत असून, नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी (दि.१९) झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या १४ दिवसांत या मार्गावर चार वेळा दरड कोसळली आहे. सुरुवातीला घाट चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. १५ जुलैनंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
संपूर्ण रस्त्याचे काम सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे काम संथ गतीने सुरू आहे. शनिवारी दुपारी चिरेखिंड-बावली टोकजवळ दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने माती आणि दरड बाजूला करण्यात आली आणि एकेरी मार्ग सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तहसीलदार कपिल घोरपडे आणि पोलीस एपीआय आनंद रावडे हे घाट परिसरात सतत पाहणी करत आहेत. चिरेखिंड-बावली परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, कंपनीचे अभियंते आणि प्रशासन यांच्या समन्वयाने तातडीने काम हाती घेऊन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.