मुंबई : मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २० कोटी रुपयांची कमाई केली आहे . अहान पांडे आणि अनीत पड्ढा यांचा हा पहिलाच चित्रपट असून, दोघांच्याही कामाचं खूप कौतुक होत आहे. 'सैयारा' चित्रपटातून अहान पांडेनं इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.
या चित्रपटातील गाणी, भावना आणि मुख्य कलाकारांचा अभिनय लोकांच्या मनाला भिडत आहे. चित्रपटात कृष्ण आणि वाणी यांच्या प्रेमकथेची कहाणी आहे. पण वाणीला अचानक अल्झायमर आजार होतो – ज्यामुळे तिची आठवणशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे त्यांच्या प्रेमात अडथळे येतात. ही भावनिक गोष्ट लोकांना फार आवडत आहे. चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याचे लीड कलाकार. कथा सामान्य वाटली तरी त्याचं सादरीकरण आणि अभिनय खूप चांगलं आहे. पहिल्या भागात ही एक सामान्य प्रेमकथा वाटते, पण इंटरवलनंतर ती एका गंभीर वळणावर जाते आणि शेवटी भावनिक करते.
'सैयारा' या चित्रपटाने जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या 'धडक' या चित्रपटाला मागे टाकत एक नवीन विक्रम नोंदवला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी अक्षय कुमार, अजय देवगण, आमिर खान आणि सनी देओल यांच्या चित्रपटांचा पहिल्या दिवशीचा विक्रमही मोडला आहे. 'स्काय फोर्स'ने पहिल्या दिवशी १२.२५ कोटी, 'रेड २'ने १९.२५ कोटी, 'जात'ने ९.५ कोटी, 'सितारे जमीन पर'ने १०.७ कोटी, 'केसरी चॅप्टर २'ने ७.७५ कोटी कमावले होते .
एकीकडे काही लोक म्हणत आहेत की हा चित्रपट कोरियन चित्रपट ‘A Moment to Remember’ वरून घेतलेला आहे. त्या चित्रपटातही अशाच प्रकारे एका मुलीला अल्झायमर होतो आणि तिचं प्रेमप्रकरण धोक्यात येतं.
यावर ‘सैयारा’ या चित्रपटाचेचे निर्माते आणि दिग्दर्शक म्हणाले की हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा रीमेक नाही. ही एक नवीन प्रेमकथा आहे. मूळ कल्पना संकल्प सदाना आणि मोहित सूरी यांची आहे.
हा चित्रपट कोरियन चित्रपटावर आधारित आहे की नाही, हे स्पष्ट नाही – पण , ‘सैयारा’ लोकांच्या मनाला भिडत आहे आणि त्यातली प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.