
माथेरान : माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांना नाईलाजाने पूर्वापार कष्टदायक कामे करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करावे लागत आहे. तसेच हातरिक्षा ओढण्याची परंपरा संपुष्टात आणण्यासाठी संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ९४ परवानाधारक हातरिक्षांपैकी केवळ वीस ई-रिक्षा कार्यान्वित झाल्या होत्या. उर्वरीत ७४ ई-रिक्षा अद्यापही येण्याच्या बाकी आहेत. मुळात फक्त वीस ई-रिक्षांमधून शालेय विद्यार्थी, रुग्ण, नागरिक आणि पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देणे जिकिरीचे बनले आहे.
त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यामुळेच पर्यटकांचा भरणा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, त्यांना वेळप्रसंगी निवासाची सोयसुद्धा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुट्ट्यांच्या हंगामात खोल्या उपलब्ध नसल्याने त्यांचा हिरमोड होऊन माघारी जाण्याची वेळ येत आहे. लहानमोठ्या सर्व व्यावसायिकांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. आजही याठिकाणी ब्रिटिश गुलामगिरीप्रमाणे पर्यटकांना वाहून नेण्यासाठी हातरिक्षा कार्यरत आहेत. उर्वरीत हातरिक्षा चालकांना या अमानवीय प्रथेतून अद्यापही मुक्ती मिळालेली नाही. सध्याचे ई-रिक्षा चालक प्रवाशांना उत्तम सेवा देत आहेत. त्याप्रमाणे उर्वरित ७४ हातरिक्षा चालकसुद्धा प्रवाशांना ई-रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. याकामी मुख्यमंत्री महोदयांनी ही बाब लक्षात घेऊन येथील अमानवीय प्रथा बंद करून या कष्टकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात. तसेच त्यांनाही सन्मानाचे जीवन कशाप्रकारे सुलभ पद्धतीने जगता येईल, यासाठी ई-रिक्षांच्या संख्येत लवकरच वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी कष्टकरी हातरिक्षा चालक करीत आहेत.
कर्जत येथील उपविभागीय अधिकारी यांनी सुप्रीम कोर्टात ई-रिक्षाची शिफारस करणारा अहवाल सादर केला आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, हातरिक्षांची अमानवीय प्रथा बंद करण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. - अंबालाल वाघेला, हातरिक्षा चालक.