Thursday, October 23, 2025
Happy Diwali

ॲप आधारित कॅब चालकांचा संप तूर्तास मागे

ॲप आधारित कॅब चालकांचा संप तूर्तास मागे

मागण्या पूर्ण न झाल्यास बुधवारपासून पुन्हा संपाचा इशारा

मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अ‍ॅप आधारित कॅबचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. परंतु, यावर कोणताच तोडगा निघू न शकल्याने व संपातही मतभेद निर्माण झाल्याने रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अ‍ॅप आधारित सेवेसाठी लागू केले जावेत ही कॅबचालकांची प्रमुख मागणी होती. मात्र, अद्याप ही मागणी मान्य झाली नसल्याने, मुंबईतील अ‍ॅप आधारित कॅब चालकांनी प्रति किमी ३२ रुपये प्रमाणे भाडे आकारून, प्रवाशांना सेवा देण्याचे ठरवले आहे. मंगळवारपर्यंत आरटीओने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, बुधवारपासून पुन्हा संप सुरू राहील, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेद्वारे दिला आहे.

ओला, उबेरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी चालकांना प्रतिकिमी ८ ते १२ रुपये भाडे दिले जात होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अ‍ॅप आधारित सेवेसाठी लागू केले जावे, अशी मागणी राज्यभरातील चालकांद्वारे केली जात होती. यासाठी आझाद मैदानात संप आणि अनिश्चित कालावधीसाठी उपोषण सुरू होते. परंतु, या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. यादरम्यान, नालासोपाऱ्यातील एका अ‍ॅप आधारित कॅब चालकाने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली व संप करण्यांमध्ये मतभेद निर्माण झाले.

शुक्रवारी अ‍ॅप आधारित कॅब चालक, त्यांचे नेते आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत चालकांच्या समस्या, मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. अनिश्चित भाडेदरामुळे चालकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जात आहे. त्यामुळे आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार, भाडे ठरवावे, अशी चालकांनी मागणी केली. या मागण्यांबाबत आरटीओ विचार करून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >