Sunday, September 14, 2025

सरकारी बहिणींचा ‘लाडक्यां’ना सल्ला

सरकारी बहिणींचा ‘लाडक्यां’ना सल्ला

रवींद्र तांबे

काही सरकारी सेवेत असणाऱ्या बहिणींनी रेल्वे प्रवासामध्ये आपल्याला गर्दीचा त्रास कसा सहन करावा लागतो, याविषयी चर्चा करून आपण या विषयावर लिहिण्याची मला विनंती केली. त्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेतलं. त्या बहिणी सरकारी असोत अथवा लाडक्या बहिणी असोत सर्वांचा रेल्वे प्रवास सुखाचा झाला पाहिजे त्यासाठी थोडक्यात घेतलेला वेध.

सध्या धावपळीच्या जीवनात लाडक्या बहिणींनी महत्त्वाच्या कामाशिवाय कार्यालयाच्या वेळेत रेल्वे गाड्यांमधून प्रवास करू नये, असा सबुरीचा सल्ला सरकारी सेवेत असणाऱ्या सरकारी बहिणींनी लाडक्या बहिणींना दिला. आपल्या राज्यात महाराष्ट्र शासनाने २८ जून, २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील विवाहित महिला, घटस्फोटित महिला, विधवा महिला, परितक्त्या, निराधार किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला यांच्यासाठी आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा मूळ उद्देश आपल्या राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य सुधारून पोषणापासून मुक्ती मिळावी हा आहे.

जरी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली नसती तरी मागासवर्गीय समाजाच्या कल्याणातून अर्ज केलेल्या सर्व महिलांना रुपये १५०० दर महिना देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाचा निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे म्हणावे लागते. आता कडक नियम व त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे बऱ्याच महिलांना आता वंचित राहावे लागते, असे असले तरी बऱ्याच गरजू महिला या योजनेपासून उपेक्षित राहिल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील काही महिला आपल्याला वालीच कोणी नाही असे म्हणतात.

मात्र राजकीय पक्षात काम करणाऱ्या व ओळखीच्या असणाऱ्या बराच महिला वर्ग खुशीत दिसत आहेत. त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना घराबाहेर जावे लागते. त्यांचा प्रवास हा बऱ्याच वेळा रेल्वेने होत असतो. तेव्हा हा सर्वांच्या हिताचा प्रश्न आहे. गर्दीत अधिक गर्दी न करता समजून घेतले तर प्रवास सुद्धा आरामदायी होऊन चेंगराचेंगरी होणार नाही. त्यासाठी सरकारी बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना दिलेला सबुरीचा सल्ला योग्य आहे. देशातील रेल्वे सेवा ही आपली सर्वांची स्वस्त, मस्त आणि वेळेत प्रवास करणारी जीवनवाहिनी आहे. आज रेल्वे ऐवजी बसने प्रवास केला असता तर बऱ्याच प्रमाणात प्रवासी घटले असते.

मात्र सध्या रेल्वेने सकाळ व संध्याकाळच्या वेळेत जर प्रवास करत असू तर रेल्वेत चढताना प्रवाशांची कशी झुंबड उडते हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यात आता लाडक्या बहिणींची भर पडत आहे. त्यामुळे सरकारी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या झालेल्या आपल्या बहिणींना सांगत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय इतर बहिणींनी रेल्वेने सरकारी कार्यालयीन वेळेत प्रवास करू नये असे सरकारी बहिणींचे म्हणणे आहे. त्यात सरकारी बहिणींना आपल्या कार्यालयात बायोमेट्रिक असल्यामुळे उशीर झाल्यास कोणत्याही प्रकारची सबब सरकारी बहिणींना सांगून चालत नाही.

रेल्वेतून प्रवास करताना महिला डब्यात सुद्धा गर्दी असते. त्यांना वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचायचे असते. म्हणून सरकारी बहिणी रेल्वेच्या दरवाजात लटकताना दिसतात. काही वेळा बोरिवली ते चर्चगेट असा प्रवास आहे असे गृहीत धरू. त्यात चर्चगेटला जाणारी लाडकी बहीण असेल तर त्यांनी डब्यात आत बसायला मिळाले तर बसावे अथवा आत जाऊन उभे राहावे. मात्र तसे होताना काही ठिकाणी दिसत नाही.

मागील आठवड्यात मुंबईतील एका रेल्वे स्टेशनमध्ये एकमेकांची धुणीभांडी काढल्याचे मी पाहिले आहे. शेवटी आपण काय मिळवले, एका राज्याची माणसे. त्यात तुम्ही काही न करता तुम्हांला रुपये पंधराशे मिळतात. तेव्हा घरी बसून त्याच्या जोडीला काहीतरी कामधंदा करा. तेवढाच कुटुंबाला आधार होईल असे सरकारी बहिणी सांगतात. आता दोन्ही बहिणींनी समजून घेणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळी घाई केल्यामुळे गाडीतील गर्दीमुळे काहींना आपला जीव गमवावा लागला असून काहींना आपला हात-पाय गमवावा लागला आहे. सध्या पंधरा डब्यांची रेल्वे झाली आहे. त्यात तीन डब्बे महिलांसाठी, मग सांगा कसा प्रवास सुखाचा होणार.

विशेष महिला रेल्वे असली तरी काहींना कार्यालयीन वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे महिलांना धकाधकीचे जीवन जगावे लागते. असे किती दिवस चालणार. हे महिलांच्यादृष्टीने हिताचे नाही. खरे म्हणजे घराचा खरा आधार महिला असते. घराचा संसार फुलविणारी ती फुलवंती असते. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. तो दुर्दैवाने होत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या लाडक्या बहिणींना साद घालण्याची वेळ आली आहे.

आता कार्यालयीन वेळेत अर्ध्या तासांची लवचिकता देण्यात आली तरी पुढील अर्धा तास थांबावे लागणार असले तरी महिला डब्यातील गर्दी कमी होणे महत्त्वाचे आहे. कारण सध्या रेल्वेच्या प्रवासाचा विचार करता सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी पुरुष काय महिलांना सुद्धा रेल्वेने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आपण समजून घेतले तर आपलाच प्रवास सुलभ आणि सुखाचा होईल. तेव्हा सरकारी महिलांनी आपल्या मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणींना सबुरीचा सल्ला दिला तरी राज्य सरकारने महिलांच्या रेल्वे प्रवास सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेणे जास्त हिताचे आहे.

Comments
Add Comment