मुंबई : दारूच्या आहारी गेलेला माणूस एका घोटासाठी काय करेल याचा काही नेम नाही. मग ती मिळवण्यासाठी तो प्रसंगी जीवाचीही पर्वा करत नाही, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे. या घटना पाहून कधी आश्चर्य वाटतं, कधी राग येतो, कधी धक्का बसतो तर कधी त्यातून घडलेल्या गमतीमुळे हसूही आवरत नाही. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून लोक पोटधरून हसत आहेत.
दारूच्या दुकानातून आणखी एक दारूची बाटली मिळते का हे पाहण्यासाठी एका दारुड्याने, हातात एक बाटली असतानाही, दुसऱ्या बाटलीसाठी दुकानाच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये डोकं घातलं आणि काही हाती लागतंय का हे पाहिलं. मात्र त्याचं डोकं त्या खिडकीतच अडकलं. काही केल्या डोकं बाहेर निघेना, त्याची सगळी दारूची नशा उतरली आणि तो घामाघूम झाला. हे पाहून उपस्थितांना हसू आवरेना. त्यापैकीच कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ केला आणि तो लगेच व्हायरलही झाला.
थोडावेळाने उपस्थितांपैकीच काहींनी त्याचं डोकं बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले. काहींनी ग्रिलचे गज वाकवण्याचाही प्रयत्न केला. तर काहींनी त्या दारुड्यालाच सुनावलं; काहीजण म्हणाले, "बरी शिक्षा मिळाली!", तर काहींनी त्या लोखंडी खिडकीचे गज बळ लावून ओढायचे प्रयत्न केले. अखेर कशीबशी त्याची अडकलेली मान बाहेर निघाली. पण त्या दारुड्याला आता चांगलीच अद्दल घडल्याचे दिसत होते.
हा व्हिडिओ chhattisgarh_fanny_torr नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. यावर वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.