Monday, August 11, 2025

गुरुवारी आमदार समर्थकांचा राडा, शुक्रवारी विधानसभाध्यक्षांचा मोठा निर्णय; आमदारांवर कडाडले मुख्यमंत्री

गुरुवारी आमदार समर्थकांचा राडा, शुक्रवारी विधानसभाध्यक्षांचा मोठा निर्णय; आमदारांवर कडाडले मुख्यमंत्री

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंड पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी गुरुवारी विधानभवनात हाणामारी केली. या घटनेची विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. अधिवेशन काळात विधिमंडळाच्या सदस्यांसोबत विधानभवनात त्यांच्या पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. अन्य कोणालाही विधानभवनात प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा विधानसभाध्यक्षांनी केली.


विधानभवनात काल घडलेला प्रकार अतिशय वाईट होता. याआधी विधानभवनात असा प्रकार कधीही घडलेला नव्हता. विधानभवनाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सगळ्या सदस्यांची आहे, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदारांना सुनावले. पुढे आमदारांसह केवळ त्यांचे पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश असेल, असंही नार्वेकर म्हणाले. त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर दोन्ही आमदारांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संताप व्यक्त केला. नार्वेकर यांनी आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितल्यावर आव्हाड यांनी मी काल एकटाच आलो होतो. माझ्यासोबत कोणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे सदनाच्या रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये, असं म्हणत बाजू मांडली. त्यावर तुम्ही दिलगिरीवर बोला, असं नार्वेकर म्हणाले. तेव्हा राष्ट्रवादी शपचे आमदार जयंत पाटील यांनी त्यांना त्यांची बाजू मांडू द्या, अशी विनंती केली.


आव्हाडांसाठी जयंत पाटील उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. या प्रकरणावर राजकारण करणं योग्य नाही. आपण कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहोत की नाही, असा सवाल मुख्यमंत्र्‍यांनी विचारला. काल घडलेल्या प्रकारानंतर सगळ्यांवरच टीका होत आहे. केवळ पडळकर, आव्हाडांवर टीका होत नाही. सगळ्याच आमदारांवर टीका होत आहे. आमदार माजलेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, असं फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्र्‍यांनी खडे बोल सुनावताच आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त केली. नितीन देशमुख माझ्यासोबत आलेला नव्हता. मारहाण झाली तेव्हा मी तिथे नव्हतो. मी मरीन लाईन्सला होतो. पण जो प्रकार झाला, तो चुकीचा आहे. त्याबद्दल मला वाईट वाटतं, असं आव्हाड म्हणाले. यानंतर वादावर पडदा पडला.


...हे योग्य नाही

विधानभवनात गुरुवारी जी मारामारी झाली ती दुर्दैवी आहे. हे विधानभवनाला शोभणारे नाही. ते होणे योग्य नाही. हे टाळण्यासाठी सभागृहाच्या सदस्यांसोबत विधानभवनात कोण येते - जाते यावर नियंत्रण हवे. काहींनी चूक केली म्हणून सर्वांना शिक्षा नको. सर्जेराव टकलेवर सहा आणि नितीन देशमुखवर आठ गुन्ह्यांची नोंद आहे. ही अशी माणसं विधानभवनात येऊन मारामारी करतात, हे योग्य नाही. अध्यक्षांनी पासबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. कुठलाही अभ्यागत येऊ द्या, बिल्ल्याशिवाय तो दिसता कामा नये. एखाद्याने येऊन अतिरेकी कृत्य केले तर जबाबदार कोण ? आमदार बिल्ला लावून येतात पण गळ्यात किमान एक ओळखपत्र असावे. जर हे होत नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्यास बाहेर काढावे; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment