मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' सध्या एका रोमांचक वळणावर आहे. इंद्रायणीने शाळा सुरू करण्याचा नवा संकल्प केला असला, तरी तिच्यासमोर आता पुंडलिक कुरकुंबे नावाचे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या काही भागांमध्ये इंद्रायणीने मोहितरावच्या आरोपांना सामोरे जात, गावकऱ्यांच्या पाठिंब्याने सरकारी जमीन प्रकरणी यशस्वी बैठक घेतली. आनंदीने तिला घरात थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले असले तरी, अधोक्षजच्या मदतीने इंद्रायणीने हुशारीने या अडचणीतून मार्ग काढला. परंतु आता तिच्यासमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे.
मालिकेच्या आगामी भागांमध्ये, एका श्रीमंत उद्योगपतीने मंदिराच्या ट्रस्टला मोठी देणगी देण्याची तयारी दर्शवली आहे, पण ती देणगी केवळ दिग्रसकर परंपरेच्या अधिकृत वारसालाच दिली जाईल अशी अट ठेवली आहे. या संधीचा फायदा घेत आनंदीला वाटते की हा हक्क अधोक्षजचा असावा. ती तातडीने एक कमिटी मीटिंग बोलावते आणि अधोक्षजला वारस म्हणून घोषित करण्याची इच्छा व्यक्त करते. मात्र, व्यंकू महाराज याला विरोध करत ही जबाबदारी पात्र व्यक्तीलाच द्यायला हवी असे सांगतात. आनंदी मात्र आपल्या मतावर ठाम राहत, जर अधोक्षज वारस न झाला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देते.
याच दरम्यान, वाड्यात सुरू असलेल्या या वादाची चर्चा संपूर्ण गावात वेगाने पसरते. अशातच, अधोक्षजची वारस म्हणून निवड झाल्याची थट्टा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. हा प्रकार पाहून इंद्रायणी अत्यंत व्यथित होते आणि यामागे कोण आहे याचा शोध घेण्यास सुरुवात करते. तिच्या शोधात तिला कळते की 'पुंडलिक' नावाचा एक व्यक्ती या सर्व प्रकारामागे आहे.
इंद्रायणी काही कृती करण्याआधीच पुंडलिक विठुचिवाडीतील विठ्ठल मंदिरात कीर्तनासाठी उभा राहतो आणि तिथूनच अधोक्षजच्या वारसत्वाला थेट आव्हान देतो. कीर्तनकार परंपरा चालवण्यासाठी अधोक्षज सक्षम नाही, असे खुलेआम सांगत तो अधोक्षजच्या तोतळेपणावरही टीका करतो. यावर इंद्रायणी पुंडलिकला ठामपणे इशारा देते की अधोक्षजच्या दोषावरून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. मात्र, गावात गैरसमज पसरू नयेत आणि अधोक्षजच्या क्षमतांविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून, इंद्रायणी पुंडलिकचे आव्हान अधोक्षजच्या वतीने स्वीकारते!
आता इंद्रायणीच्या या निर्णायक पावलामुळे दिग्रसकर परंपरेला काय वळण मिळेल? पुंडलिकचे आव्हान तिला पार करता येईल का? अधोक्षजला मिळणारं वारसत्व मान्य होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'इंद्रायणी' दररोज संध्याकाळी ७ वाजता आपल्या कलर्स मराठीवर.