Saturday, August 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना आता ‘लेटमार्क’चे नो टेन्शन!

सरकारी कर्मचाऱ्यांना आता ‘लेटमार्क’चे नो टेन्शन!

रेल्वे सेवेतील विस्कळीतपणा, अपघातामुळे कामावर होत असे विलंब


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि सततच्या अपघातांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर जाण्याची परवानगी दिली असल्याची माहिती विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


सरनाईक म्हणाले की, मुंबईतील रेल्वेवरील ताण कमी करणे आणि कार्यालयांतील गर्दी टाळणे, हे या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट आहे.


भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही घोषणा झाली. या घोषणेमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना ‘लेटमार्क’ लागणार नाही. खासगी कर्मचाऱ्यांसाठीही लवकरच टास्क फोर्स स्थापन करून वेळेचे पुनर्नियोजन करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी जाहीर केले आहे. हा किरकोळ बदल असला तरी लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. मेट्रोसारख्या पर्यायी वाहतूक पद्धती वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



राज्य सरकारचा मोठा दिलासा; सरनाईकांची विधानसभेत घोषणा


अर्धा तास उशिरा पोहोचण्याची परवानगी : मुंबईतील लोकल रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, अपघातांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या सर्व गोष्टींना अनुसरून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात अर्धा तास उशिरा पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे. विधानसभेत सरनाईक यांनी ही घोषणा करताना सांगितले की, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन, सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कार्यालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात येईल.



वाढत्या रेल्वे अपघातांचा मुद्दा


भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले की, कार्यालयीन वेळा थोड्याशा लवचिक केल्या, तर हजारो कर्मचारी गर्दीच्या तासांत प्रवास करण्यापासून वाचू शकतील. अर्धा तास उशिरा कार्यालयात हजर होण्याची मुभा देण्यात येत असली, तरी कामाचे एकूण तास कमी होणार नाहीत. सायंकाळी तेवढाच वेळ वाढवून भरपाई करावी लागेल, असेही सरनाईकांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा