
लवकरच स्थलांतरित केली जाणार केबल्स
मुंबई : मुंबईतील मालाड मालवणी परिसरातील लगून मार्ग आणि हमीद मार्गाच्या विकासाचा मार्ग आता खुला होत असून या मार्गाच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या टाटा पॉवर कंपनीची विजेची केबलची उंची आता वाढवली जाणार आहे. विजेची केबल ही आता ८ मीटर उंचीपर्यंत वाढवली जाणर आहे. ज्यामुळे आता या लगून रोडची सुधारणा करून याचा विस्तार अब्दुल हमीद रस्त्यापर्यंत करणे शक्य होणार आहे.
पी उत्तर विभागातील एलिया सरवत उर्दू हायस्कूल मालवणी नाला ते मालाड सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत उर्वरित लगून रोडची सुधारणा आणि लगून रोडचा अब्दुल हमीद रस्त्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रस्ते विभागाच्यावतीने घेण्यात आला होता; परंतु लगून रोडचा अब्दुल हमीद रस्त्यापर्यंत विस्तार करण्याच्या कामामध्ये टाटा पॉवर यांची २२ किलोव्हॅटची उच्च दाबाच्या ओव्हरहेड केबल्सचा प्रमुख अडसर होता. त्यामुळे या केबल्सची उंची वाढवणे ही प्रमुख समस्या असल्याने या रस्त्याचा विकास रखडला होता. लगून रोडचा विस्तार अब्दुल हमीद रस्त्यापर्यंत ३६.६०मीटर रुंद करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात या रस्त्याची यादी १० मीटरपासून १८ मीटरपर्यंत आहे. या प्रस्तावित रस्त्याच्या पूर्व बाजूला दलदल आहे आणि पश्चिम बाजूला झोपड्यांचे अतिक्रमण आहे. तसेच हा रस्ता कांदळवनाच्या जागेतून जात असून तो सीआरझेडमध्ये मोडत आहे.
या रस्त्यावरून २२ किलोव्होल्ट ओव्हरहेड केबल जात आहेत. त्यामुळे या रस्त्याच विकास करताना पिलर हलवणे आणि उच्च दाबाची केबल्सची उंची वाढवण्यो आवश्यक बनले आहे. या केबल्सची उंची विद्यमान जमिनीपासून ५.४० मीटर ते ८ मीटर एवढी आहे. त्यामुळे या रस्त्यावरील केबल्सची उंची ३०.५० मीटर उंचीपर्यंत वाढवणे आवश्यक असल्याने यासंदर्भात टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या ट्रान्समिशन कंपनीला पत्र देऊन महापालिकेची याची उंची वाढवण्यासंदर्भात विनंती केली. त्यानुसार या कंपनीला प्रारंभिक शुल्क अदा केल्यांनतर या नवीन बांधण्यात येणाऱ्या रस्त्यावर क्रॉसिंग स्पॅनमध्ये नवीन टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.