अभय दातार : मुंबई ग्राहक पंचायत
कर्ज घ्यायचे म्हटले की, आपली जुनी पिढी दहा वेळा विचार करेल. कर्ज घेण्याची खरोखरीच आवश्यकता आहे का? मी माझ्या बचतीतून खर्च करू शकतो का? माझ्याकडचे दागिने विकून पैसे उभे करू शकतो का? अशा अनेक शक्यता तपासून बघतो आणि मग काय तो निर्णय घेतो. या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील ग्राहकांची मानसिकता काय आहे याचा धांडोळा मल्होत्रा नावाच्या एका गृहस्थांनी घेतला आणि त्याची तुलना भारतीय मानसिकतेशी केली आहे.
कोणत्याही कारणासाठी कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्ड वापरणे हे अमेरिकन ग्राहकांच्या हाडामासात खिळलेले आहे. ८२ टक्क्यांहून अधिक प्रौढ अमेरिकनांकडे किमान एक तरी क्रेडिट कार्ड आहे. तिथेही ‘क्रेडिट स्कोअर’ अर्थात आपले पतमानांकन ही संकल्पना आहे. अर्थातच याचा प्रभाव गृहकर्जावरील व्याज दरापासून नोकरीच्या अर्जापर्यंत सगळीकडे पडतो.
पत मानांकन चांगले असेल तर स्वस्त व्याज दरात कर्ज मिळू शकते आणि अगदी नोकरी मिळण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. मार्च २०२४ मधील आकडेवारीनुसार अमेरिकनांनी क्रेडिट कार्डद्वारे वापरलेली एकूण रक्कम १.३४ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्स इतकी अवाढव्य आहे. (गरजूंनी याचे भारतीय रुपयात रूपांतर करावे) आपल्याकडे काय परिस्थिती आहे? कर्ज घेणे किंवा उधारी हे पारंपरिक दृष्टिकोनातून योग्य नसले, तरी आकडेवारी सांगते की, आपला देश याबाबतीत एका क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे.
सध्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ५.५% (साडेसात कोटींहून अधिक) लोकांकडे क्रेडिट कार्ड्स असली, तरी आधुनिक विचारांच्या नव्या पिढीमुळे क्रेडिट कार्ड्स घेऊन शक्य असेल तिथे त्यांचा वापर करणे यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा वर्षांत कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण १२ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर गेले आहे. अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी असली तरी भारतीय क्रेडिट कार्डधारकांनी वापरलेली रक्कम रु. २ लाख कोटींच्या वर आहे. या मानसिकतेतील फरकही लक्षात घ्यायला हवा. अमेरिकतील ही मानसिकता परिपक्व आणि पूर्णपणे व्यावसायिक, तर आपली मानसिकता नवी, परंतु उत्साही.
अमेरिकेतील क्रेडिट कार्ड संस्कृतीचा उदय हा तेथील अर्थकारण जेव्हा ग्राहककेंद्री बनू लागले तेव्हाचा, म्हणजे साधारणत: १९५० च्या दशकातला. दुसरे महायुद्ध संपले होते आणि शहरांच्या जोडीने उपनगरांचाही विकास होऊ लागला होता. युद्धामुळे आलेली मंदी कमी होऊन हळूहळू सुबत्ता येऊ लागली. लोकांची प्राप्ती वाढू लागली.
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती आवाक्यात येऊन त्यांची खरेदीही वाढू लागली. ही अचूक वेळ साधून डायनर्स क्लब या जगप्रसिद्ध कंपनीने सामान्य लोकांना सर्वसाधारण वापरासाठी उपयोगी पडावे असे एक कार्ड बाजारात आणले. हे कार्ड वापरल्यावर येणारे बील सुलभ हप्त्यात भरायची, तसेच शिल्लक असलेली मर्यादा परत परत वापरायची सोय अमेरिकन लोकांना चांगलीच भावली. १९७० ते १९८० या दशकात तेथील बँकाही या व्यवसायात उतरल्या आणि जन्माला आली ती ग्राहकांचे पतमानांकन करणारी व्यवस्था. त्यामुळे कोणाला क्रेडिट कार्ड किंवा कर्ज द्यावे, त्यात जोखीम किती, याचा आढावा घेणे बँकांना शक्य होऊ लागले.
अर्थात हा सगळा प्रवास सुरळीतपणे पार पडला असे म्हणता येणार नाही. २००८ साली आलेल्या भीषण मंदीने अनेकजण होरपळून निघाले. पण त्यातूनही उभारी घेऊन सर्वसाधारण अमेरिकन माणसाने क्रेडिट कार्ड संस्कृती जपली आहे. कर्ज घेणे हे आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे असे तिथे मानले जाते. भारतातील परिस्थिती आता फारशी वेगळी नाही. आपल्या येथील प्रवास सावधगिरीकडून उपभोगाकडे होऊ लागला आहे. एके काळी कर्ज घेणे निषिद्ध मानले जात होते. बचतीकडे कल होता. कर्ज घ्यावे लागलेच तर ते उच्चशिक्षण किंवा घर खरेदी यापुरतेच मर्यादित होते.
साधारणत: सरकारी बँका किंवा बिगर बँकिंग कंपन्या लोकांच्या या गरजेची पूर्तता करायच्या. हौसेमौजेसाठी किंवा इतर काही कारणासाठी कर्ज घेणे ही संकल्पना १९९० साली जागतिकीकरणाचे दरवाजे खुले झाल्यावर रुजू लागली. खासगी बँका अस्तित्वात आल्या. ऑनलाईन व्यवहार वाढू लागले. खरेदी-विक्रीसाठी ई-कॉमर्सचा उदय झाला. काय हवे ते खरेदी करा आणि हप्त्याहप्त्याने त्या किमतीची परतफेड करा किंवा आता क्रेडिट कार्डाने खरेदी करा आणि महिनाभराने बील आल्यावर ते चुकते करा, अशा संकल्पनांचे अक्षरश: पेव फुटले. त्यातूनच पुढे हळूहळू कार खरेदी, वैयक्तिक कारण, महागडी घड्याळे, महागडे मोबाइल्स यासाठी कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डचा वाढता वापर होऊ लागला.
कर्ज देणाऱ्या काही कंपन्यांनी तर छोट्या छोट्या खरेदीसाठी ‘शून्य व्याज ईएमआय’ची सुविधा उपलब्ध करून दिली. जोडीला व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. तरुणपणीच हातात चांगला पैसा खेळू लागला. याचा परिणाम असा झाला की, केवळ पाच वर्षांपूर्वी असलेली क्रेडिट कार्डधारकांची साडेपाच कोटींची संख्या दुपटीने वाढली. हे सगळे काही दिसायला छान छान असले, तरी त्यातील अंगभूत धोके जाणून सावधगिरी बाळगायला हवी. कर्जे बुडीत जाण्याचे अमेरिकेतील प्रमाण वाढत आहे. आपल्या देशातही विशेषत: ग्रामीण किंवा निमशहरी भागात कर्जाच्या सापळ्यात फसणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढू लागले आहेत.
एक कर्ज फेडण्यासाठी एक कार्ड वापरले, त्याच्यावरील कर्ज फेडण्यासाठी दुसरे कार्ड वापरले, असे गंभीर प्रकार चालू झाले आहेत. गुंतवणुकीतून दामदुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषानेही कर्ज घेऊन अशी गुंतवणूक केली जात आहेत. एकतर ही कर्जे तारणविरहित, म्हणजेच असुरक्षित आणि त्यातून ही कर्जे वसूल होत नसल्याने बँकांचीही डोकेदुखी वाढू लागली आहे. मध्यंतरी रिझर्व्ह बँकेने केलेल्या पाहणीनुसार काही गोष्टी चिंताजनक बनू लागल्या आहेत.
चक्क सोन्याच्या तारणावरील कर्जांचे थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. जोडीला तारणविरहित कर्जांचे प्रमाणही वाढू लागले आहे. सध्या अमेरिकेच्या तुलनेत आपली आकडेवारी फारशी वाईट दिसत नसली, तरी आपल्या एकूण लोकसंख्येचा विचार करता परिस्थिती स्फोटक बनू शकते. ते होऊ नये म्हणून गरज आहे ती योग्य शिक्षणाची आणि लोकांना जागृत करण्याची.
mgpshikshan@gmail.com