Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Bhaskar Jadhav : अखेर भास्कर जाधव यांनी सभागृहात मागितली माफी!

Bhaskar Jadhav : अखेर भास्कर जाधव यांनी सभागृहात मागितली माफी!

मुंबई : राजकारणात कितीही मस्तवाल झाला, तरी एक वेळ अशी येतेच… जेव्हा “मीच चुकलो!” हे मान्य करावं लागतं. काल अध्यक्षच विधानसभेच्या परंपरा पाळत नाहीत असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) माध्यमांसमोर हल्लाबोल केला होता, आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. अध्यक्ष सभागृहाच्या परंपरा पायदळी तुडवत असून, सरकारला वाचवण्याचं काम करत असल्याचं जाधव म्हणाले होते. विरोधकांच्या हक्कांचं संरक्षण करत नसल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. “महाराष्ट्राच्या विधीमंडळाची संपूर्ण परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे,” असं जाधव यांनी माध्यमांसमोर नमूद केलं. त्यावरती आज भास्कर जाधवांनी सभागृहात माफी मागितली आहे.

तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्विकारायला तयार : भास्कर जाधव

मी हातवार करून बोलतो, मी जाणिवपुर्वक हातवारे करून बोलतो, मला सस्पेंड करायचं असेल तर करा, जे आहे ते मी सांगतो. 'मी लगेच उठलो, मला माहिती आहे मी कधी उठलो नव्हतो, मला चांगलं माहिती आहे, आत्ता सुध्दा माझे हात हालत आहेत. आत्ताही आपण राम कदम यांना पुढचा प्रश्न विचारला तर त्यांनी हात पुढे केले. आमचा गुन्हा आम्ही मान्य करतो. अध्यक्ष महोदय माझ्याकडून जे शब्द बाहेर बोलले गेले, त्या संदर्भात मी माफी मागतो. यावर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्विकारायला तयार आहे, असंही पुढे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी भास्कर जाधव यांनी जी भावना व्यक्त केली ती मोठ्या मनाने स्विकारावी, असं म्हटलं आहे.

हवी ती शिक्षा मला द्या

माझ्याकडून माध्यमांसमोर जे शब्द गेले ते जायला नको होते, अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे सांगतो हे शब्द माझ्याकडून गेले त्याबद्दल हवी ती शिक्षा मला द्या मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे, असंही पुढे भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी अखेर आपली चूक मान्य केली आहे. माझ्याकडून बाहेर जे शब्द गेले ते योग्य नाही, माझी चूक झाली मी ते कबूल करतो आणि मी माफी मागतो, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली आहे, आणि सभागृहानेसुद्धा भास्कर जाधवांना मोठ्या मनाने माफ केलं.

नेमकं काल काय घडलं?

भास्कर जाधव यांनी सभागृहात काल (गुरूवारी) केलेले हातवारे आणि वापरलेली भाषा, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधकांच्या २९३च्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा काही प्रश्न विचारण्याची (राइट टू रिप्लाय) परवानगी अध्यक्षांकडे मागितली. मात्र, चर्चेची सुरुवात ठाकरे यांनी केली होती, आता ते सभागृहात नाहीत, त्यामुळे इतर कोणालाही मी ही संधी देणार नाही, असे सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर आक्रमक होत जाधव अध्यक्षांकडे हातवारे करत जोरदार बोलत होते. जाधव यांच्या या कृतीने शिंदेसेनेचे मंत्री आणि आमदार वेलमध्ये उतरले आणि मोठा गोंधळ झाला होता.

Comments
Add Comment