
सांगली : सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाले आहे.
राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे ही हिंदुत्ववादी संघटना तसंच त्या शहरातील नागरिकांची सातत्यानं मागणी होती. ती मागणी सरकारनं मान्य केली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शहराचं नाव बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आले. तसंच उस्मानबादचे नाव धाराशिव आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नावसुद्धा बदलण्यात आलं आहे. या बदलाचे स्वागत आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव करण्यात यावे अशी माहिती मागणी आम्ही केली होती. वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मागणी नाव बदलण्यासंदर्भात केली होती. त्यामुळे ईश्वरपूरच्या लोकांचे मी अभिनंदन करतो, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.