माझे कोकण : संतोष वायंगणकर
मराठी मनाला आनंद वाटेल अशी घटना मागील आठवड्यात घडली. महाराष्ट्राला अभिमान वाटणारी ही घटना आहे. महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील ११ गडकिल्ल्यांचा जागतिक वारसास्थळामध्ये समावेश झाला. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातली स्थापत्य कला जागतिक स्तरावर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रमाचे खऱ्या अर्थाने जिवंत साक्षीदार असणारे हे गडकिल्ले जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील हे गडकिल्ले महाराष्ट्रातील जनतेला माहिती होतेच; परंतु त्याला आता युनेस्कोमध्ये स्थान मिळाल्यामुळे विश्वव्यापी झाले आहेत.
आज या गडकिल्ल्यांवर हजारो पर्यटक येत असतात. मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष असणारे हे गडकिल्ले एकाचवेळी युनेस्कोच्या नकाशावर यावेत हे खरं तर मराठी मनाला सुखद अशी घटना आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्गाबरोबरच अन्य किल्ल्यांचा समावेश आहे. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी, लोहगड, साल्वेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तामिळनाडुतील जींजी या प्रत्येक किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ला छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थापनाचा स्थापत्य वैशिष्ट्यासह बांधण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे किल्ले तर समुद्रातच उभे आहेत.
विजयदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आरमारी तळ म्हणून ओळखला जायचा. आजवर या गडकिल्यांची बरीच पडझडही झाली. पुरातत्त्व विभागाच्या सुधारणांना फारच मर्यादा होत्या. आता युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात या गडकिल्ल्यांचा समावेश झाल्याने साहजिकच राज्य आणि केंद्र सरकारकडून देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जाऊ शकतो. जागतिक स्तरांच्या वारसास्थळांची जपणूकही होऊ शकते. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राजाचा इतिहास जगासमोर युनेस्कोच्या माध्यमातून केला आहे.
कोकणात गेल्या काही वर्षांत पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोकणातील निसर्ग, स्वच्छ सुंदर आणि आकर्षण ठरणारे समुद्र किनारे यामुळे साहजिकच पर्यटकांचा ओघ वाढला आहे; परंतु युनेस्कोच्या रेकॉर्डनंतर जागतिक स्तरातील पर्यटकांचा ओघ भविष्यात मोठा वाढणार आहे. मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा इतिहास देशपातळीवरही माहीत होता. आता इतिहासाची, पराक्रमाची पानं जागतिक स्तरांवर उलगडली जात आहेत.
एकीकडे मराठ्यांच्या युद्धनीतीवर प्रकाश पडेल. कोकणातील ही वारसास्थळ या पुढच्या काळात केवळ पर्यटन स्थळ असणार नाहीत, तर सर्वांगाने जागतिक स्तरावरचा येणारा पर्यटक त्यांच्या-त्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत राहिल. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, त्यांच्या शौर्यगाथा नव्याने जगासमोर मांडल्या जातील. त्याचा निश्चितपणे फायदा कोकणातील पर्यटन वाढीला होऊ शकेल. आजवर केवळ इतिहासप्रेमी, इतिहास अभ्यासकच या गडकिल्ल्यांच्या भेटीला जात होते; परंतु यापुढच्या काळात सर्वच पर्यटक या जागतिक वारसास्थळांना भेटी देतील. आता या जागतिक वारसा यादीत जरी भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले असले तरीही भविष्यात या युनेस्कोच्या यादीतील वारसास्थळं त्याच पद्धतीने जपली पाहिजेत.
यापुढे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थायिक असणाऱ्या सर्वांनाच स्वत:ला काही शिस्त अंगीकारणे आवश्यक आहे. बऱ्याच पर्यटनस्थळांवर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या अशाच फेकल्या जातात. समुद्र किनाऱ्यांवर जेव्हा साफसफाई केली जाते तेव्हा तर ढीगभर कचरा, रिकाम्या बाटल्या सापडतात. आपण एक बाटली फेकली म्हणून काय फरक पडतो असा काहीसा गैरसमज करून घेऊन परिसर अस्वच्छ करण्यात हातभार लावला जातो.
कोणी सांगून, बोलून शिस्त लागत नाही. प्रत्येकाने ठरवूनच ती पाळावी लागेल. आज युनेस्कोच्या यादीत आपल्या महाराष्ट्रातील, कोकणातील वारसास्थळांचा समावेश होणं ही घटना कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याजोगी आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांचा समावेश असणं कोकणच्या पर्यटन विकासात किती भर घालणार आहे, याचा विचारही कोकणवासीयांना करता येणार नाही. यापुढे कोकणात येणारा पर्यटक हा जगभरातून येणारा असेल. या आंतरराष्ट्रीय पर्यटकाला आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे. यानिमित्ताने येणारा पर्यटक कोकणातच थांबला पाहिजे, राहिला पाहिजे. जगातून येणारा पर्यटक या पर्यटनस्थळांवर येऊन पैसे खर्च करण्याच्या मानसिकतेत असेल; परंतु येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता जाणून त्याप्रमाणे त्यांना आनंदी वातावरण निर्माण करणे आणि पर्यटक आनंदी कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपलीच असणार आहे.
अनेक संस्था, व्यक्ती, केंद्र, राज्य सरकार या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे मोठे फलित आहे. कोकणातील ही वारसास्थळे पर्यटकांचा मोठा ओघ वाढवणारी आहेत. कोकणासाठी भाग्याची ही बाब आहे. महाराष्ट्राला जशी ती अभिमानास्पद आहे त्याचप्रमाणे कोकणालाही ही बाब मान उंचावणारी आहे. आपणाकडे वारसा जतन केलेला होताच यानिमित्ताने तो जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाला आहे. युनेस्कोने त्यावर मोहोर उठवली. युनेस्कोच्या यादीत वारसास्थळांचा समावेश झाला हे आपण जपले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष ठरणारे हे गडकिल्ले विश्वव्यापी झाले आहेत. आपल्या महाराजांच्या पराक्रमांच्या यशोगाथा ऐकताना निश्चितपणाने अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी प्रत्येक बाबतीतले बारकावे या सर्वांबद्दलची माहिती आता या पुढच्या काळात जगाच्या केवळ नकाशावर असणार असे नाही, तर त्यांच्या वैशिष्ट्यांची चर्चाही जागतिक स्तरावर होतील. छत्रपतींच्या या इतिहासाच्या कथा जगाला प्रेरणा देत राहतील. यामुळेच कोकणासाठी ही फार मोठी बाब आहे.