अॅक्सिअम - ४’ मोहिमेतलं अंतराळवीरांना परत पृथ्वीवर घेऊन येणारं 'ग्रेस यान' मंगळवारी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी प्रशांत महासागरातल्या अमेरिकेच्या सेंट दियागो किनाऱ्यालगत पाण्यात अलगद उतरलं, तेव्हा भारताने आपल्या अंतराळ विज्ञानाच्या प्रगतीतला खूप महत्त्वाचा टप्पा पार केला. ‘अॅक्सिअम-४’ अंतराळ मोहिमेत सहभागी झालेल्या ४ अंतराळवीरांपैकी केवळ एक, शुभांशू शुक्ला भारतीय असला, तरी भारताच्या आगामी ‘गगनयान’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी, स्वदेशी मोहिमेची मुहूर्तमेढ शुभांशूच्या या यशस्वी अंतराळफेरीने रोवली, हे महत्त्वाचं आहे.
शुभांशूआधी भारताचा राकेश शर्मा हा अंतराळवीरही अंतराळात जाऊन सुखरूप परतला आहे. पण, त्याचा अंतराळ काळ कमी दिवसांचा होता आणि ती मोहीम मुख्यतः रशियाचीच होती. रशियाच्या ‘सॅल्यूट - ७’ या अंतराळ तळावर आठ दिवस राहून राकेश शर्मा परत आला, त्याला चाळीस वर्षे झाली. राकेश शर्माचा आदर्श समोर ठेवून सुधांशू शुक्ला अंतराळात गेला. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्रात पाऊल ठेवणारा तो पहिला भारतीय ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर २० दिवस राहून सुखरूप परतणाराही तोच पहिला भारतीय ठरला. भारताच्यादृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रयोग त्याने केले. त्या प्रयोगांनी संबंधित क्षेत्रात नवी दिशा सापडेल आणि समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी त्यातून जी रहस्य उघडतील, त्याचं प्राथमिक श्रेयही सुधांशूलाच द्यावं लागेल! शुभांशूचं सुरू असलेलं कौतुक, त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट, जिद्द आपल्या उगवत्या पिढीपुढे ठेवली, तर त्यातून आणखी अनेक अंतराळवीर तयार होतील आणि ते भारताचे नाव अवघ्या विश्वात उंचावतील, यात शंका नाही.
'अॅक्सिअम - ४' ही मोहीम खरंतर गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच फत्ते व्हायची होती. पण, वातावरणाच्या अनेक अडचणी येत गेल्या. नवी तारीख जाहीर व्हायची, संपूर्ण तयारी केली जायची; पण हवामान आणि पृथ्वीच्या कक्षेच्या सीमारेषेवरील वातावरण दरवेळी काहीतरी नवी अडचण उभी करत असे. अखेरीस २६ जूनचा मुहूर्त कामी आला. त्या दिवशी अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या यानासह अग्निबाणाने पृथ्वीची कक्षा ओलांडली. यानाने आपल्या १८ दिवसांच्या अंतराळ मुक्कामात पृथ्वीभोवती तब्बल २८८ प्रदक्षिणा घातल्या, ७६ लाख मैलांचा प्रवास केला.
४३३ तासांच्या या अथक प्रवासादरम्यान सर्व शास्त्रज्ञांनी मिळून एकूण ६० संशोधनपर प्रयोग केले. शुभांशूने केलेल्या प्रयोगांमुळे भारतातल्या स्टेम सेलसंबंधातील संशोधनाला गती मिळेल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. भारत आज अंतराळ संशोधनात अग्रेसर नाही, हे खरं. पण, त्या यादीत पहिल्या पाचांत आहे, हेही खरं. या क्षेत्रातील अतिप्रगत देशांच्या पंक्तीत मानाचं स्थान मिळवण्यासाठी भारताला अजून वेळ आहे. नियोजित ‘गगनयान योजने’ने या क्षेत्रात आणखी काही पावलं पडतील, असं मानायला मात्र जागा आहे. ‘अॅक्सिअम- ४’ योजनेतला शुभांशूचा सहभाग, ‘नासा’च्या अमेरिकेतल्या संशोधन केंद्रात तब्बल आठ महिने शिकण्याची मिळालेली संधी, अंतराळ प्रवासाचा आणि रहिवासाचा अनुभव - हे सगळंच 'गगनयान'साठी पायाभरणी ठरणार आहे. ही पायाभरणी अगदी भक्कम झाली, असं 'इस्रो'तील तज्ज्ञांचं मत झालं आहे. अॅक्सिअम-४’मधील तीच भारताची मोठी कमाई आहे.
‘गगनयान योजने'साठी संपूर्ण भारतीय बनावटीच्या एचएलव्हीएम-३ या अग्निबाणाची उभारणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. गगनयान अंतराळ यानाची उभारणीही अंतिम टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी ज्यांची निवड झाली आहे, त्या प्रशांत नायक, अजित कृष्णन् आणि अंगद प्रताप यांना भारत आणि रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थांकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रकही तयार आहे. २०२८ मध्ये नियोजनानुसार गगनयान मोहीम यशस्वी होईल, असा या क्षेत्रातल्या तमाम शास्त्रज्ञांचा दृढ विश्वास आहे. त्याला धोरणकर्त्यांनी बळ द्यायला हवं. विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनासाठी अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.५% निधी खर्च करते, तर चीन २.७% निधी खर्च करतो.
दक्षिण कोरियासारखा छोटा देश संशोधन, विकासावर त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ टक्के निधी खर्च करतो. ब्राझीलही त्यासाठी १.२% निधी राखीव ठेवतो. भारताचा हा खर्च आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या अवघा ०.७% टक्के आहे. म्हणजे, भारताने आपल्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी किमान एक टक्क्यांचं महत्त्वाकांक्षी(!) उद्दिष्ट ठेवायला हवं, असं म्हणावं लागेल. आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार, शिक्षण प्रसार, विविध क्षेत्रांत देशाची सुरू असलेली घोडदौड पाहता या बाबीवरही अत्यंत गांभीर्याने विचार व्हायला हवा.
सध्या दिसत असलेली प्रगती शाश्वत असावी, असं वाटत असेल, तर संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या स्वदेशी प्रगतीसाठी निधीची चांगली तरतूद होणं गरजेचं आहे. संशोधन आणि नवीनतम कल्पनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच एक लाख कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे. त्या निधीचा योग्य आणि कार्यक्षम वापर झाला, तर भारताची तरुणाई त्यात आपलं भरीव योगदान देईल यात शंका नाही.