Thursday, August 21, 2025

बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही प्रवासी वाहतूक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे करून शासनाची व प्रवाशांची फसवणूक करण्यात येत आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीप्रमाणे समुच्चयांनी मोटार वाहन धोरणानुसार ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या अशा कंपन्यांकडून कुठल्याही ‍नियमांचे पालन न करता विना परवानगी प्रवासी वाहतूक सुरू होती.

अशा बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सी विरोधात मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन कार्यालय अंतर्गत २० वायुवेग पथकांमार्फत एकाच वेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे संयुक्त कारवाई मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये अवैधरीच्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक टॅक्सी) अटकावून ठेवण्यात आली आहेत. तसेच अवैध ॲग्रीकेटर विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असे अप्पर परिवहन आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments
Add Comment