Monday, August 25, 2025

अभिनेत्याला ३४ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका

अभिनेत्याला ३४ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका

मुंबई : 'पंचायत' वेब सिरीजमध्ये 'दामाद जी' ही भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ खान याला ३४ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. सध्या आसिफवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने रुग्णालयातूनच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या हाताला आयव्ही ड्रिप लावल्याचे दिसत आहे. याच हाताने त्याने  'मैं जिंदा हूँ' हा राहत इंदोरी यांचा कवितासंग्रह बेडवर धरुन ठेवल्याचे दिसत आहे.

वेळेत उपचार मिळाल्यामुळे आसिफ खानची प्रकृती सावरत आहे. आसिफच्या तब्येतीबाबत ताजी माहिती मिळताच चाहत्यांना हायसं वाटलं. अनेक चाहत्यांनी आसिफच्या फोटोवर प्रतिक्रिया देत त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी आसिफ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असल्याचेही प्रतिक्रियांमध्ये नमूद केले आहे.

याआधी रुग्णालयात दाखल करुन दोन दिवस होत आले असताना आसिफने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत रुग्णालयाचे छत दिसत आहे. 'मागील ३६ तासांपासून हे बघितल्यानंतर मला जाणवले, आयुष्य खूप लहान आहे. एकाही दिवसाला गृहीत धरू नका, एका क्षणात सर्व काही बदलू शकते, तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबाबत आणि तुम्ही जे काही आहात त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्यासाठी कोण जास्त महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांची नेहमी कदर करा. जीवन ही एक देणगी आहे आणि आपल्याला तो आशीर्वाद मिळाला आहे.' अशी कॅप्शन आसिफने फोटोत दिसणाऱ्या रुग्णालयाच्या छताला दिली होती. आसिफने आणखी एक पोस्ट करुन मागील काही तासांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी लढत असल्याची आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली होती.

आसिफ खानने 'पाताल लोक १' मध्ये आसिफने कबीर एम नावाच्या संशयिताची भूमिका साकारली होती. आसिफने नेटफ्लिक्सच्या क्राइम ड्रामा सिरीज 'जामतारा- सबका नंबर आएगा' मध्ये अनस अहमदची भूमिका साकारली होती.

आसिफने 'रेडी' (२०११) आणि 'अग्निपथ' (२०१२) या चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले. तो 'टॉयलेट: एक प्रेम कथा' (२०१७), 'पगलैट' (२०२१) आणि 'ककुडा' (२०२४) मध्येही दिसला. 'द भूतनी' या हॉरर-कॉमेडी चित्रपटातही त्याने भूमिका साकारली आहे.

Comments
Add Comment