Thursday, September 18, 2025

इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर भीषण हल्ला

इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर भीषण हल्ला

दमास्कस : इस्रायलने सीरियावरील हल्ले तीव्र केले आहेत.इस्रायली सैन्य दलाने बुधवारी (दि.१६) सीरियाची राजधानी दमास्कसमधील सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला. दक्षिण सीरियाच्या स्वैदा शहरात स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदायाच्या लढाऊंमध्ये झालेल्या चकमकीनंतर इस्रायलने सीरियाच्या सैन्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.सोमवारपासून इस्रायल सीरियाच्या इस्लामिक नेतृत्वाखालील सरकारच्या सैन्याला लक्ष्य करत आहे.

सीरियाच्या संरक्षण मंत्रालयातील सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, मंत्रालयाच्या इमारतीवर किमान दोन ड्रोन हल्ले झाले आहेत आणि अधिकारी तळघरात लपून बसले आहेत. सीरियाच्या सरकारी वृत्तवाहिनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत.

स्थानिक सैनिकांच्या हल्ल्यांपासून ड्रुझ अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी ते हे हल्ले करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, 'आम्ही दमास्कसमधील सीरियन राजवटीच्या लष्करी मुख्यालय संकुलाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे. दक्षिण सीरियातील ड्रुझ नागरिकांविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईवर सैन्य लक्ष ठेवून आहे.'

सीरियाच्या सरकारी माध्यमांनी बुधवारी(दि. १६) सांगितले की, इस्रायलने प्रामुख्याने स्वैदा शहराला लक्ष्य केले. सोमवारी(दि.१४) ड्रुझ लढाऊ आणि बेदौइन सशस्त्र गटांमधील लढाई दडपण्यासाठी सरकारी सैन्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा हा संपूर्ण संघर्ष सुरू झाला. ड्रुझ लढाऊ आणि सरकारी दलांमध्ये लढाई सुरू झाली. दोन्ही बाजूंमध्ये युद्धबंदी होती, परंतु त्याचे वारंवार उल्लंघन केले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्वैदा शहर आणि आजूबाजूच्या गावांना या जोरदार स्फोटांचा आणि तोफगोळ्यांचा फटका बसला. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वैदामधील बेकायदेशीर गट युद्धबंदीचे उल्लंघन करत आहेत.

Comments
Add Comment