डॉ. राणी खेडीकर : अध्यक्ष, बाल कल्याण समिती-पुणे
आज मी काही पुस्तकांसाठी क्रॉसवर्डमध्ये फेरी मारत होते. तिथे एक लहान मुलगी आपल्या पायांच्या अंगठ्यांच्या अगदी टोकावर उभी राहून पुस्तकांच्या वरच्या कप्प्यावरून एक पुस्तक काढण्याचा प्रयत्न करत होती. मी बाजूलाच होते, म्हणून लगेच तिला ते पुस्तक काढून दिलं, पण माझ्या हातातून ते पुस्तक खाली पडलं आणि मी त्या पुस्तकाचं शीर्षक वाचलं. ती लहान मुलगी, ... शीर्षक असलेलं पुस्तक(शीर्षक लिहिणं टाळलं आहे) घेऊन बिलिंग काऊंटरकडे पळत गेली. आठ नऊ वर्षांचं हे कोवळं वय आणि तिचे निरागस स्मितहास्य याचा मेळ त्या पुस्तकांशी जमणार होता का, असा प्रश्न मनात आला.
कारण या उत्तर बाल्यावस्थेतील मुलांचे तार्किक तर्क वाढणे, विज्ञान कल्पनेत जास्त रस वाढणे, स्पष्टीकरणात साधर्म्यांचा वापर करणे, समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास करणे, आकलन शक्ती आणि निरीक्षण शक्ती उत्कट होणे ही वैशिष्ट्ये असतात.
स्मृती आणि कल्पनाशक्तीची स्वतःची शक्ती वापरण्याची क्षमता, या वैशिष्ट्यांचा अभ्यास करता या वयातील बालकांना तशा सकारात्मक संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येतेय. आकलनशक्ती उत्तम होत जाण्याच्या वयात आपण आयुष्य जगण्याची काही विशिष्ट तत्त्व असावी आणि ती कोणती असावी याबाबत बालकांचे मार्गदर्शन त्यांच्या आवडीच्या पद्धतीने करू शकतो.
मग माझी पण उत्सुकता वाढली ते पुस्तक चाळून बघण्याची. मी पण त्या वरच्या कप्प्यातून ते पुस्तक काढलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचे रक्ताचे डाग अगदी खरे वाटावे म्हणून भडक लाल रंग वापरला होता. त्यावर काळ्या रंगाच्या उभ्या पसरट मानवी आकृत्या होत्या. पुस्तक उघडून थोडी प्रस्तावना वाचली, तर लक्षात आलं एक मानसिक रोगी असलेल्या माणसाची ती कहाणी होती. ज्याने सात महिलांची अत्यंत क्रूरतेने कत्तल केली होती. हे पुस्तक या लहान बालिकेला का वाचावेसे वाटले असणार ?
डॉ. विजयाताई वाड यांनी लिहिलेली प्रायश्चित नावाची एक बालकथा आठवली. या कथेमध्ये गुरुनाथ नावाच्या एका बालकाची कथा आहे. त्यात किती सहजतेने चोरी करणं, हे किती चुकीचे आहे हे समजावून सांगितले आहे. या कथेत मोठ्यांनी समजूत काढल्यानंतर चुकीचे प्रायश्चित करून पुढे सकारात्मक मार्ग कसा निवडला हे सांगितलं आहे. ही कथा अत्यंत बालसुलभ भाषेत लिहिलेली आहे आणि सहजतेने जीवन शिक्षण देण्याचा उद्देश पूर्ण केला आहे. ती कथा बालकांनी वाचणं खूप आवश्यक आहे.
अशी पुस्तके या बालिकेच्या हातात असायला हवी, असं कळकळीने वाटून गेलं. पण खालच्या कप्प्यातील तिच्या वयासाठी उपलब्ध पुस्तकं तिने बघितलीदेखील नाही. वयाआधी उगाचच आलेलं हे मोठेपण कोणाची देणगी आहे? पालकांच्या अवास्तव अपेक्षादेखील याचं कारण असू शकते. कारण बिलिंग काऊंटरवर उभे असलेले तिचे बाबा अतिशय अभिमानाने सांगत होते की, माझी मुलगी खूप मॅच्युअर आहे. हे अकाली आलेलं प्रौढत्व बालपण होरपळून काढणारं असतं याचा विचार पालकांनी करायलाच हवा.
बालकांसाठी असलेलं साहित्य आणि बालकांनी निर्माण केलेलं बालसाहित्य याची अशी कितीशी जमापुंजी आता उपलब्ध आहे? अशावेळी मोजक्या दर्जेदार साहित्यिकांची नाव आपल्या समोर येतात. त्यात प्रामुख्याने डॉ. विजयाताई वाड यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. खूप मोठा बाल साहित्याचा ठेवा त्यांनी बालकांना सुपूर्द केला आहे. आज बालके किती प्रमाणात वाचन करतात हा प्रश्न तर महत्त्वाच आहेच, पण काय दर्जाचे साहित्य वाचतात हा गंभीर विषय आहे. बालकांनी त्यांच्यासाठी असलेलं साहित्य वाचावं यासाठी शिक्षक, पालक यांचा आग्रह असतो पण बालकांना ते वाचण्यात किती रुची असते हा अभ्यासाचा विषय आहे. आज आपल्याला फक्त बालकांसाठी लिहिण्यात आलेली गाणी, गोष्टीची पुस्तके फारशी बघायला मिळत नाही.
बालकांना वाचनाची त्यांच्यासाठी असलेल्या साहित्य वाचनाची गोडी निर्माण करणं अत्यावश्यक आहे. वाचन केल्याने बालकांचा दृष्टिकोन व्यापक होईल आणि लक्ष विचलित होणं कमी होऊन त्यांच्या बालमनाला पोषक आहार मिळेल. त्या-त्या वयाला त्या-त्या वयाचं कुतूहल असतं, ते शमवण्याचा प्रयत्न बालक आपआपल्या परीने करत असतात. त्यात त्यांना मदत करण्यास आम्ही सगळ्यांनी सोबत असायला हवं.
बालकांना आपली तत्त्व, आपले विचार याची बैठक बसवण्याच्या प्रक्रियेत काय योग्य-अयोग्य, विशिष्ट परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रगल्भता, ही एकाएकी येत नाही. त्या विशेष टप्प्यांची माहिती देण्याची जबाबदारी आपली आहे. उत्तर बाल्यावस्थेत आकलनशक्ती कमालीची वाढत असते. बालक त्यांनी कळलेली एखादी गोष्ट समजावून सांगण्यात खूप उत्सुक असतात. आकलन म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेऊन, विश्लेषण करून त्यावर स्वतःच्या विचारांद्वारा इतरांना व स्वतःलाच सोप्या भाषेत समजावून देता येणे. याचा उपयोग करून अनेक छान विचारांनी प्रेरित करणारी पुस्तके बालकांना वाचायला देऊन त्याबाबत बालकाशी चर्चा करणं आणि त्यांची वाचनाबाबत आवड वाढवत जाणं आवश्यक आहे. मग माहिती केवळ उपदेशाने दिली गेली, तर बालक त्यांचा अवलंब करणार नाहीत, उलट ते वैतागतील. विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करावा लागणार त्यामध्ये बाल साहित्याची महत्त्वाची भूमिका आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईत पहिले राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. संमेलनात बालकाच्या प्रश्नांवर लिखाण करण्यासाठी आणि बालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी मला सन्मानित करण्यात आलं. संमेलनात सामील काही बालकांनी लिहिलेल्या गोष्टी आणि कवितांची पुस्तके प्रकाशित झाली. बालकांनी स्वरचित कविता सादर केल्या. एका बालिकेने 'उंच आकाशी उडावे' अशा शीर्षकाची कविता प्रस्तुत केली. तिच्या बालभावना या कवितेतून व्यक्त झाल्या. तिची स्वप्न ती सुरेख शब्दात मांडू शकली, अशी संधी बालकांना उपलब्ध करून द्यायला हवी.
नित्य नियमाने अभ्यास व्यतिरिक्त दर्जेदार आणि बालकांसाठी उपलब्ध साहित्याचे वाचन करण्याची सवय बालकांमध्ये निर्माण होण्यास आपण प्रयत्न करूया. केवळ वाचन नव्हे तर बालकांना लिखाण करण्यास प्रोत्साहित करूया. व्यक्त होण्याचं हे एक प्रभावी माध्यम निश्चितच आहे. आपल्या सकारात्मक प्रयत्नांनी बालकांना योग्य दिशा मिळू शकेल, यात शंका नाहीच.