Friday, August 8, 2025

Ajit Pawar : पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar : पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई : सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी ५५ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.



विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पामध्ये एकूण १३ इमारती आणि २१३ रहिवासी युनिट आहेत. या १३ इमारतींपैकी १२ इमारती ४ मजली असून, एक इमारत ५ मजली आहे. त्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या ७ इमारतींमध्ये २४ दुकानांचे गाळे आहेत. या सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे देण्याच्या दृष्टीने आजच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील. या सफाई कामगारांच्या प्रलंबित घरांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Comments
Add Comment