मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे
जालना-मुंबई अशा धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. देशाचे माजी रेल्वे राज्यमंत्री तथा मराठवाड्याचे नेते रावसाहेब दानवे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. २८ ऑगस्टपासून ही रेल्वेसेवा नांदेडवरून सुरू होणार आहे; परंतु या विस्ताराला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून प्रचंड विरोध होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही रेल्वे जालना ते मुंबई या दरम्यानच असावी; परंतु नांदेडवरून ही रेल्वे सुटत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेच्या वेळेवर फरक पडणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील विकासकामांना खीळ बसेल, असे तेथील अनेकांचे म्हणणे आहे. 'वंदे भारत' रेल्वेसेवा सर्वच जिल्ह्यांना हवीहवीशी वाटणारी आहे. एकीकडे या विस्तारामुळे मराठवाड्यातील नांदेड व परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला; परंतु त्या आनंदावर विरजण पडावी अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांच्या म्हणण्यानुसार नांदेडच्या राजकारणी मंडळींनी दबाव आणून ही रेल्वे पळवून नेली. नांदेड ते मुंबई हे ६०८ किलोमीटरचे अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने ६४ किलोमीटर प्रति तास या गतीने ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे.
रेल्वेसेवेचा जेवढा विस्तार होईल तेवढा सर्वसामान्य जनतेबरोबरच देशालाही फायदा असतो. देशभरात अनेक रेल्वेंचा विस्तार करण्यात आला आहे. त्या विस्तारामध्ये वंदे भारतचाही समावेश आहे. मराठवाड्यात नांदेड या शेवटच्या जिल्हापर्यंत वंदे भारतचा विस्तार केल्यामुळे टोकाच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी कमी वेळेचा पर्याय उपलब्ध झाला आहे; परंतु ही सेवा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना गैरसोयीची ठरत आहे. अशी आरोळी ठोकून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांनी या विस्ताराला विरोध दर्शवून दिल्ली गाठली आहे. प्रस्तावित नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला नांदेड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वीस मिनिटांचा स्लॅक टाईम आहे. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक दरम्यान तीस मिनिटांचा तर नाशिक ते मुंबई दरम्यान पुन्हा ३० मिनिटांचा असा एकूण जवळपास दीड तासांचा अनावश्यक स्लॅक टाईम कमी केल्यास नांदेड-मुंबई हा रेल्वे प्रवास केवळ आठ तासांत शक्य होऊ शकतो. दक्षिण मध्य रेल्वेने या स्लॅक टाईमवर विशेष लक्ष दिल्यास नांदेडवरून सकाळी ५ वाजता निघणारी वंदे भारत मुंबईला दुपारी १ वाजता पोहोचू शकते व छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यातून होत असलेला विरोध यामुळे संपू शकतो, असे रेल्वे खात्यातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मराठवाड्याचे भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यातून ही रेल्वे सध्या सकाळी ५ वाजता सुटत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी पावणेसहा वाजता ही रेल्वे मुंबईसाठी रवाना होते. मनमाड-नाशिक रोड-कल्याणमार्गे ठाणे-दादर व त्यानंतर मुंबईला ही रेल्वे सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांना पोहोचते. ही रेल्वे १२ बाराच्या अगोदर मुंबईला पोहोचत असल्यामुळे त्याचा फायदा जालना व छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना होतो; परंतु या रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार होत असल्याने ही रेल्वे सकाळी ५ वाजता नांदेडवरून सुटेल व दुपारी अडीच वाजता मुंबईला पोहोचेल या सर्व प्रस्तावित बदलामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांचा ताळमेळ मुंबईला ये-जा करण्यासाठी बसणार नाही. यामुळे तेथून या विस्ताराला प्रचंड विरोध होत आहे. तसे पाहिले तर नांदेडवासीयांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊन देखील फायद्याची ठरणार नसल्याचे चित्र दिसत आहे. ही वंदे भारत सध्या आठ डब्यांची आहे; परंतु पुढील ऑगस्ट महिन्यात नांदेडवरून जेव्हा ही रेल्वे धावणार आहे, त्यासाठी त्याला बारा अतिरिक्त डबे जोडून ही वंदे भारत २० डब्यांची असणार आहे. नांदेड ते पूर्णा जंक्शन हे अंतर केवळ अर्ध्या तासाचे आहे व पूर्णा येथून दररोज सकाळी पावणेसहा वाजता मुंबईला जाणारी शताब्दी एक्स्प्रेस दुपारी साडेतीन वाजता मुंबईला पोहोचते.
हिंगोली ते मुंबई अशी धावणारी शताब्दी एक्स्प्रेस नांदेडवासीयांना देखील सोयीची असताना सकाळच्या वेळेतच वंदे भारत या रेल्वेला नांदेडपर्यंत का वाढविले? अशी विचारणा जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होत आहे. याच वंदे भारतमुळे छत्रपती संभाजीनगर व नांदेड या दोन जिल्ह्यांत वादाची ठिणगी पडली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील उद्योजक तथा नागरिक संबंधित पुढाऱ्यांना प्रश्न विचारून तसेच सोशल मीडियावर याबाबत चर्चा करून नेत्यांना टार्गेट करत आहेत. वंदे भारत नांदेडपासून सुरू व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण, नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार बंडू जाधव, खासदार अजित गोपछडे यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा केला; परंतु या सर्व राजकीय मंडळींना दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत तेलंगणात असलेली निजामबाद ते तिरुपती धावणारी रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत आणता आली नाही; परंतु मराठवाड्यातीलच राजधानीची एक्स्प्रेस नांदेडकरांनी पळविली. अशा शब्दात नांदेडच्या नेत्यांवर मराठवाड्यातून विशेषतः छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून टीकेची झोड उठत आहे. रॉयलसीमा एक्स्प्रेस ही तिरुपतीला जाण्यासाठी नांदेडकरांना अतिशय उपयुक्त रेल्वे ठरू शकते; परंतु तेलंगणातील खासदार कुठल्याही परिस्थितीत सदरील रेल्वे नांदेडपर्यंत जाऊ द्यायला तयार नाहीत व या रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार व्हावा या दृष्टीने नांदेडची नेतेमंडळी प्रयत्नात कमी पडत आहे, हे वास्तव आहे.
रेल्वे सेवेचा बोजवारा
अगोदरच मराठवाड्यात रेल्वेसेवेचा बोजवारा उडालेला आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेडला रेल्वेचे डीआरएम ऑफिस आहे. या ठिकाणाहून तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे सुरू असतात; परंतु महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसाठी नांदेडवरून आणखी स्वतंत्र रेल्वेची नितांत गरज आहे. याबरोबरच मराठवाड्यातील नागरिकांसाठी पुण्याला जाण्यासाठी सोयीच्या वेळेत रेल्वेसेवा हवी आहे. सध्या मराठवाड्यातून पुण्याला जाण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या वेळेबाबत प्रवासी वर्गाची प्रचंड तक्रार आहे. एकीकडे तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादला नांदेडवरून १५ पेक्षा अधिक रेल्वे धावतात; परंतु त्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजधानीला म्हणजेच मुंबईला जाण्यासाठी नेहमीच रेल्वे तिकिटांचा तुटवडा असतो. या बाबीकडे रेल्वे खात्याने तसेच मराठवाड्यातील पुढाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे; परंतु हे करण्याऐवजी मराठवाड्यातील नेतेमंडळी वंदे भारतवरून एकमेकांवर आगपाखड करण्यात धन्यता मानत आहेत. कोरोना काळात बंद करण्यात आलेली मुंबईहून नागपूरपर्यंतची नंदिग्राम एक्स्प्रेस अद्यापही नागपूरपर्यंत धावत नसल्याने त्याबाबत मराठवाड्यातील नेतेमंडळी मूग गिळून गप्प का बसले आहेत, असाही प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.