मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवली असून आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. जयंत पाटील गेल्या ७ वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष होते.






