Wednesday, August 13, 2025

मलवाहिन्यांच्या सफाईतील अडथळा होणार दूर

मलवाहिन्यांच्या सफाईतील अडथळा होणार दूर

महापालिका खरेदी करणार ७ कोटींचा रोबो


मुंबई : मुंबई महापालिकेच्या अनेक जुन्या मलवाहिन्यांची सफाई योग्यप्रकारे करतानाच आतील बाजुस झाडांची पाळेमुळे तसेच आतील भाग मोडकळीस आल्यास त्यातील अडथळा दूर करणे जिकरीचे होत असते. मात्र, या मलवाहिन्यांमध्ये मनुष्य प्रवेश करून त्याची सफाई करणे अशक्य असल्याने तसेच मनुष्याच्या जिविताच्या दृष्टीकोनातून धोकादायक असल्याने मलवाहिन्यांची सफाई रोबोच्या माध्यमातून केली जाणार आहे. पालिकेच्यावतीने आता सिवर क्लिनिंग रोबोची खरेदी केली जाणार आहे. या रोबोची खरेदी तब्बल ७ कोटी रुपयांना केली जाणार आहे. मात्र, याची किंमत अधिक असली तरी मनुष्याच्या जीवापेक्षा कमीच असल्याने पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे मलवाहिन्यांची सफाई योग्य वेळेत पार पाडणे शक्य होणार आहे.


मुंबई शहर आणि उपनगरांमधील विविध आकारांच्या मलवाहिन्यांची सफाई मशिनरीद्वारे केली जाते. परंतु बऱ्याच वेळा या सफई दरम्यान मलवाहिन्यांमध्ये दगड, माती, सिमेंट काँक्रिट आदींचा शिरकाव होवून मलवाहिन्या जाम होवून त्यातील मलमिश्रित पाणी बाहेर रस्त्यांवर वाहू लागते. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये मलवाहिन्यांमध्ये झाडांची पाळेमुळे पसरुन ती अधिक घट्ट होवून जातात आणि यामुळे मलमिश्रित पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मलवाहिन्यांची सफाई योग्यप्रकारे करण्यासाठी तसेच अडकलेल्या वस्तूंना बाजुला करण्यासाठी सिवर क्लिनिंग रोबोचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोबोच्या माध्यमातून मलवाहिनी अडकलेला दगड ही योग्य साधनांच्या मदतीने त्यांना बाजुला करणे किंवा दूर करणे शक्य होणार आहे. ग्राईडींग, मिलिंग, मॉड्युल तसेच अल्टा व्हायलेट लाईट क्युअरड मॉडयुल यांच्यामुळे लहान मलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पुनर्वसनाची कामेही करता येणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >