भाईंदर : शहरातील गृहसंकुल आणि सार्वजनिक ठिकाणावरून कचरा गोळा करण्यासाठी बसविण्यात आलेले कचऱ्याचे डब्बे खराब झाल्याने नव्याने खरेदी करण्यासाठी बाजारभावापेक्षा ७ ते ८ पट अधिक दराने घेऊन १९ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्याचे उघडकीस आल्याने महापालिका अधिकाऱ्यांना कचऱ्याच्या डब्यात सोन्याची खाण सापडल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
शहरातील गृहसंकुल आणि सार्वजनिक ठिकाणावरून कचरा गोळा करण्यासाठी बसविण्यात आलेले डब्बे खराब झाल्याने ७० हजार रुपये प्रति नग किमतीचे ५०० डब्बे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसेच ९ लाख ५० हजार रुपये प्रति नग किमतीचे २१ ऑटोमॅटिक डब्बेही खरेदी करण्यात येणार आहेत. एकूण ३,८८९ डब्ब्यांच्या खरेदीसाठी १९ कोटी रुपयांचा खर्च होणार असून, महापालिकेने मंजुरी दिली आहे.
कंत्राटदाराने सादर केलेल्या दरानुसार स्टेनलेस स्टील पावडर कोटेड बिन्ससाठी प्रति नग ६६,१८३ रुपये स्टेनलेस स्टील-अॅल्युमिनियम कोटेड बिन्ससाठी ६९,६६८ तर ऑटोमॅटिक डब्ब्याची किंमत तब्बल ९,३४,५६० प्रति नग, फायबर डब्ब्याची किंमत ३४,५५१ प्रति नग अशी नमूद करण्यात आली आहे.
सदरचे काम शासन निधीतून असून या कामाकरिता दरसुचीमध्ये दर नसल्याने विहित पद्धतीचा अवलंब करून चालू बाजार भावातील दरानुसार दर निश्चित करून त्यास तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता घेऊन विहित पद्धतीने शासनाच्या वेबसाईटवर मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदेमधून किमान दर विचारात घेऊन निविदा मंजुरीचा ठराव करण्यात आलेला आहे; परंतु या प्रकरणी कोणताही कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आलेला नाही.
- राधा बिनोद शर्मा, महापालिका आयुक्त