दमास्कस : इस्रायलने शत्रूचा बीमोड करण्यासाठी थेट सीरियावर हल्ला केला. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर इस्रायलच्या ड्रोनने हल्ला केला. गाझामध्ये हमास आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह विरोधात लढत असलेल्या इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाला लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले.
दक्षिण सीरियातील ड्रुझबहुल स्वैदा शहरात सरकारी सैन्य आणि स्थानिक ड्रुझ योद्धे यांच्यात संघर्ष सुरू असताना दमास्कसमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाला लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्यात आले. इस्रायल सरकारने हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही कारवाई ड्रुझ नागरिकांच्या संरक्षणासाठी होती, असे इस्रालयने सांगितले.
दमास्कसमधील सीरियन राजवटीच्या लष्करी मुख्यालयाला लक्ष्य केल्याचे इस्रायलने सांगितले. दक्षिण सीरियातील ड्रुझ नागरिकांवरील कारवाईला आळा घालण्यासाठीच ही कारवाई केल्याचे इस्रायलने सांगितले.
सीरियाच्या भूभागावर इस्रायलने केलेला हा सलग तिसरा हल्ला आहे. यापूर्वी स्वेदा आणि आसपासच्या भागात अनेक हवाई हल्ले करण्यात आले होते. बुधवारीही दिवसभर स्वेदा शहर आणि आसपासच्या गावांमध्ये मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा झाला आहे.
सीरियाने हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर इस्रायलने दोन ड्रोनने हल्ला केल्याचे सीरियाने सांगितले. इस्रायलच्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले, असेही सीरियाने सांगितले.
सीरियन सरकारने ड्रुझ आणि बेदौइन समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांना शांत करण्यासाठी सैन्य पाठवले तेव्हा स्वैदामध्ये हिंसाचार सुरू झाला. सीरियाचे सरकारी सैनिक आणि ड्रुझ यांच्यात संघर्ष सुरू झाला. या पार्श्वभूमीवर इस्रायलने हस्तक्षेप केला. ड्रुझ नागरिकांच्या रक्षणासाठी कारवाई करत असल्याचे इस्रायलने सांगितले. पण इस्रायल सीरियातील आपले प्रभावक्षेत्र वाढव्याच्या उद्देशाने प्रयत्न करत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.