Friday, August 8, 2025

Uday Samant: खटाव मिलमधील जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाणार

Uday Samant: खटाव मिलमधील जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाणार

खटाव मिलमध्ये मिल कामगारांसाठी आता गृहसंकुल योजना


मुंबई: मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात २०१९ पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार आणि नवीन डीसीपीआर अंतर्गत, आतापर्यंत १३ हजार ५०० घरे बांधण्यात आली असून उर्वरित जमिनीवर काम सुरू आहे. खटाव मिलची १० हजार २२८. ६९ चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला मिळणार असून, तितकीच जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल. या जागेतून ९०० ते १ हजार नवीन घरे उभारली जातील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेत सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात २०१९ पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम ५८) आणि नवीन डीसीपीआर (कलम ३५) अंतर्गत, गिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महापालिकेला बगीचे व क्रीडांगणासाठी, एक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू आहे. जर काही मिल कंपाउंडने अद्याप वन थर्ड जमीन दिली नसेल, तर ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत मिल कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध न झाल्यास ठाणे, वसई-विरार, परिसरातही कामगारांसाठी घरे देण्यात येतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.
Comments
Add Comment