
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले जाहीर
मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार नवीन कर्करोग रुग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. ही रुग्णालये पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे असतील. रुग्णालय निर्मितीसाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यात महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याबाबत शासन संवेदनशील असून उपचारापेक्षा प्रतिबंध बरा यानुसार कर्करोग निदानासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar )यांनी विधानसभेत चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितले.
महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण याविषयी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. मंत्री आबिटकर म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचारांचे नवीन पॅकेजेस वाढविण्यात येत आहेत. या माध्यमातून उपचार करण्यात येणाऱ्या आजारांची संख्याही वाढणार आहे. सर्व कर्करोगावरील उपचारांचा यामध्ये समावेश असणार आहे.
राज्यात गर्भाशयमुख कर्करोगाचे लसीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना येत आहेत. या सूचना आल्यानंतर लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येईल. गर्भाशयमुख कर्करोग लसीकरण वयोगट ९ ते ३० मधील मुली व महिलांना करण्यात येईल. विशेषतः ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्यात येईल.
अडीच कोटी नागरिकांची तपासणी
राज्यात अडीच कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये एक कोटी महिलांचा समावेश होता. तपासणी केलेल्या महिलांपैकी १३ हजार महिला संशयित कर्करुग्ण म्हणून आढळून आल्या आहेत. त्यांना समापदेशन करण्यात येत आहे. राज्यात आठ कर्करोग निदान व्हॅन कार्यान्वित आहेत. कर्क रुग्णाची भीती घालवण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने राज्यात कर्करुग्णावरील उपचारासाठी १७ डे केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अबिटकर म्हणाले.