फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
आलकांना असलेला तीव्र ताण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या अशा वागणुकीसाठी कारणीभूत ठरतात. पालक अनेकदा तीव्र ताण, नैराश्य, चिंता किंवा इतर मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रासलेले असतात. आर्थिक समस्या, नातेसंबंधातील संघर्ष, कौटुंबिक कलह किंवा कामाचा ताण यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्थिर होतात आणि अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावतात. अशा स्थितीत, मुलांच्या लहान चुकाही त्यांना असह्य वाटू शकतात आणि त्यातून ते हिंसक होतात. पालकत्वाचा ताण, सततच्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी घेणे, मुलांच्या गरजा पूर्ण करणे, आर्थिक भार आणि सामाजिक अपेक्षा यामुळे पालकांना प्रचंड ताण येऊ शकतो, ज्यामुळे ते ‘बर्नआऊट’ होतात. अशा परिस्थितीत ते चिडचिडे होतात आणि त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आपलं मूल मागे पडणार नाही ना, ते योग्य वळणावर, वाटेवर राहील ना, त्याच्या कोणत्याही कृत्यामुळे आपली बदनामी होणार नाही ना? आपलीच मुलं आपल्याला समाजात मान खाली घालायला लावतील का? आपण त्यांच्यावर केलेल्या शैक्षणिक खर्चाचं ते सार्थक करतील का? अशा सततच्या नकारात्मक विचारांमुळे पालक त्रस्त असतात. राग आणि निराशा या बाबी पालकांना सतत अस्वस्थ करतात. पालकांना स्वतःच्या आयुष्यातील अपयश, निराशा किंवा अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यामुळे प्रचंड राग येऊ शकतो. हा राग अनेकदा मुलांवर काढला जातो. कारण मुले त्यांच्या नियंत्रणाखाली असतात आणि स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. मुलांना सतत धाकात, दाबावात, शिस्तीत ठेवणं म्हणजेच पालकत्व अशी धारणा अनेकांची असते. अनेक पालकांना त्यांच्या लहानपणी जे काही व्हायचं होतं, करायचं होतं, मिळवायचं होतं ते परिस्थितीअभावी करता आलेलं नसतं. असे पालक मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात टाकण्यापेक्षा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात जायला जबरदस्ती करतात आणि त्यात अपेक्षा पण खूप ठेवतात. मुलांना जर लादलं गेलेलं करिअर यशस्वीरीत्या पार नाही पाडता आले तर त्यांना दोष देणे योग्य नाही.
स्वत:वरील अवास्तव अपेक्षा आणि सामाजिक दबाव या कारणास्तव पालक आपली विचारसरणी सांभाळू शकत नाहीत. समाजात ‘आदर्श पालक’ असण्याचा दबाव प्रचंड असतो. जर मुलांनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही किंवा त्यांच्याकडून चुका झाल्या तर पालकांना स्वतःची निराशा वाटते आणि ते स्वतःला अपयशी समजतात. आपणच कुठेतरी मुलांना घडवण्यात कमी पडलो, आपल्या संस्कारात कमतरता राहिली, आपल्याला योग्य आदर्श मुलं तयार करता आली नाहीत यातून ते कधीकधी टोकाची भूमिका घेतात. कोणतंही मूल आणि कोणताही पालक शंभर टक्के योग्य किंवा आदर्श कधीच नसतो हे समजणे गरजेचे आहे. पालकांचा बालपणीचा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा असतो. काही पालकांनी स्वतः बालपणी शारीरिक किंवा मानसिक अत्याचार अनुभवले असतील. यामुळे त्यांना आक्रमकतेचे किंवा हिंसाचाराचे वर्तन सामान्य वाटू शकते आणि ते आपल्या मुलांशीही त्याच पद्धतीने वागू शकतात. काही घरात जुन्या वळणानुसार पालकांना त्यांच्या आई-वडिलांनी मारहाण करणे, कठोर शिक्षा देणे, उपाशी ठेवणे, कोंडून ठेवणे, घराबाहेर काढणे, त्याच्याशी दीर्घ काळ अबोला धरणे, शिवीगाळ करणे, चटके देणे, बांधून ठेवणे असे प्रकार केलेले असतात. अशा वातावरणात मोठी झालेली पालक मंडळी या गोष्टीला खूप गांभीर्याने घेत नाहीत आणि आताच्या पिढीतील मुलांना पण क्रूरतेने वागवणे म्हणजे शिस्त लावणे असेच समजतात. आम्ही कसं सगळं सहन केलं तसंच आमच्या मुलांनी पण करावे अशा चुकीच्या अपेक्षा मुलांकडून ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे.
मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय जर पालकांना असेल तर त्यांची हिंसक प्रवृत्ती अजून उफाळून येते. मद्यपान किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली व्यक्तीच्या विचारशक्तीवर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे पालक अनियंत्रित होऊन मुलांना इजा पोहोचवू शकतात. भावनात्मक संबंधांचा अभाव हा पण महत्त्वाचा मुद्दा असून, काही पालकांचा आपल्या मुलांशी भावनिक संबंध चांगला नसतो. यामुळे त्यांना मुलांबद्दल सहानुभूती वाटत नाही आणि ते त्यांच्यावर सहजपणे राग काढू शकतात. अनेकदा मुलगा हवा होता पण मुलगी झाली, दोन्ही मुलंच झाली किंवा तिन्ही मुलीचं झाल्या या तुलनात्मक वातावरणामुळे लहानपणापासून असे पालक मुलांशी व्यवस्थित संवाद, नातं, आपलेपणा निर्माण करू शकलेले नसतात. मूल जन्माला घातलं, कर्तव्य केली, त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय इतकंच औपचारिक नातं अशा पालकांमध्ये आणि मुलांमध्ये पाहायला मिळते. आपल्याच मुलांमध्ये पालक भेदभाव करतात, दुय्यम वागणूक देतात, कोणावर जास्त प्रेम तर कोणाचा तिरस्कार करतात. समाजातील वाढती हिंसा आणि असंवेदनशीलता यामुळे निर्दयी होत चाललेले मन आणि मृत होत चाललेल्या भावना सुद्धा हिंसक प्रवृत्तीला कारणीभूत असतात.
समाजात एकूणच हिंसा आणि असंवेदनशीलता वाढत असल्याने, लोकांना जीवनाचे मूल्य कमी वाटू लागले आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते आणि त्याचे परिणाम कौटुंबिक स्तरावरही दिसू लागले आहेत. एखाद्याचा जीव घेणं हाच रागावरील तोडगा आहे इतक्या सहजासहजी लोक खून करतात. अशा गंभीर समस्यांवर आपण काय उपाययोजना करू शकतो अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी काही उपाययोजना महत्त्वाच्या आहेत यावर देखील आपण बोलणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य सेवा आणि समुपदेशनाचे महत्त्व लक्षात घेऊन, पालकांसाठी मानसिक आरोग्य तपासणी आणि समुपदेशन सेवा सहज उपलब्ध असाव्यात. विशेषतः नवीन पालकांसाठी आणि ज्यांना पालकत्वाचा ताण जाणवत आहे, त्यांच्यासाठी समुपदेशन अनिवार्य करावे. शाळांना, क्लासेसमध्ये, महाविद्यालयांना असे समुपदेशन सत्र आयोजित करणे बंधनकारक असावे.
(क्रमश:) meenonline@gmail.com