
उरण: देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या आणि काळाबाजारातून बेकायदेशीर स्फोटक वस्तू भारतात आणणाऱ्या तस्करांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जोरदार झटका दिला आहे. 'ऑपरेशन फायर ट्रेल' या गुप्त मोहिमेतून मुंबई विभागीय युनिटने न्हावा शेवा बंदर, मुंद्रा बंदर आणि कांडला SEZ (विशेष आर्थिक क्षेत्र) येथून तब्बल ३५ कोटी रुपयांचे चिनी फटाके असलेले ७ कंटेनर जप्त केले आहेत!
'डेकोरेटिव्ह प्लांट्स'च्या नावाखाली १०० मेट्रिक टन स्फोटक!
जप्त केलेल्या या फटाक्यांचे वजन तब्बल १०० मेट्रिक टन असून, हा संपूर्ण स्फोटक साठा अत्यंत चलाखीने खोट्या घोषणांच्या आड लपवण्यात आला होता. 'मिनी डेकोरेटिव्ह प्लांट्स', 'आर्टिफिशियल फुलं' आणि 'प्लास्टिक मॅट्स' अशा बिनधोक वस्तू म्हणून जाहीर करून हे फटाके बेकायदेशीरपणे देशात आणण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र, DRI च्या बारकाईच्या तपासामुळे हा स्फोटक कट उधळून लावण्यात आला.
धोकादायक रसायनं आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका
या फटाक्यांमध्ये लाल शिसे, लिथियम, तांबे ऑक्साईडसारखी अत्यंत धोकादायक रसायने आढळली आहेत. कोणत्याही परवानग्या न घेता या मालाची आयात करण्यात आली होती, जी भारताच्या विदेश व्यापार धोरण आणि २००८ च्या स्फोटक नियमांनुसार 'प्रतिबंधित श्रेणीत' येते. DGFT (परराष्ट्र व्यापार महासंचालनालय) आणि PESO (स्फोटक सुरक्षा संघटना) यांच्याकडून परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक असतानाही, या नियमांना हरताळ फासत, SEZ युनिटच्या माध्यमातून देशांतर्गत वितरणासाठी ही मालवाहतूक सुरू होती.
DRI ने या कारवाईमागे असलेल्या सूत्रधाराची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. संबंधित SEZ युनिटमधील एक भागीदार असल्याचे उघड झाले असून, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या कारवाईमुळे केवळ चिनी फटाक्यांची धाडसी आयातच थांबवली नाही, तर देशाच्या सुरक्षेसमोर असलेला एक मोठा स्फोटक धोकाही टाळण्यात यश मिळाले आहे. DRI च्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा देशद्रोही तस्करांना अद्दल घडवण्याची ही फक्त सुरुवात आहे, असे जाणकारांचे मत आहे.