Wednesday, August 6, 2025

Dada Bhuse : शालार्थ प्रणालीत बोगस शिक्षकांची नावे; SIT चौकशी होणार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Dada Bhuse : शालार्थ प्रणालीत बोगस शिक्षकांची नावे; SIT चौकशी होणार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक : शिक्षण मंत्री दादाजी भुसे


मुंबई : राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नावे शालार्थ प्रणालीत नियमबाह्य समाविष्ट केल्याच्या प्रकरणी एस्आयटीद्वारे (विशेष अन्वेषण पथक) चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.



आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना सांगितले की, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. काही राजकीय व्यक्ती, माजी राज्यमंत्री यामध्ये सहभागी आहेत. बोगस शिक्षकांना थकित वेतनही देण्यात आले आहे. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली जाते. याविषयी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक भरती गुणवत्तापूर्ण व्हावी, ही शासनाची भूमिका आहे. १९ सहस्र उमेदवारांची भरती झाली असून १० सहस्र जागांवर प्रगतीपथावर आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे शाळांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते. अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी होत आहे, याविषयी तक्रार प्राप्त नाही.



शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक


राज्यातील सर्व शाळांना मराठी शिकवणे बंधनकारक असून शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत लावणे बंधनकारक असेल, असे शिक्षणमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment