मुंबई: कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विधान भवनात आज बैठक पार पडली. या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, कोकणातील प्रकल्पांना अधिक गती द्यावी आणि नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित तसेच वेळेवर वीज सेवा उपलब्ध करून द्यावी. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये व समुद्रकिनारी सुरू असलेल्या ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असून, कामे दर्जेदार व कालबद्ध असावीत, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
आवश्यक असलेले अतिरिक्त सबस्टेशन वाढवून, जंगल भागातून गेलेल्या जुन्या वीज वाहक तारा या रस्त्याच्या बाजूने नेण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना योगेश कदम यांनी यावेळी दिल्या. यामुळे वीज सेवेत खंड पडणार नाही. याची दृष्टीने योग्य ती कारवाई करावी असे निर्देश ही राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिले. तसेच, जुनी व मोडकळीला आलेली पायाभूत सुविधा तातडीने दुरुस्त करावी, नवीन सबस्टेशन्स आणि मनुष्यबळ वाढवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठका आयोजित कराव्यात, आणि सुरू असलेल्या कामांची माहिती सविस्तर स्वरूपात सादर करावी, असे आदेशही मंत्री कदम यांनी बैठकी दरम्यान दिले. या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत कोकण विभागातील विविध ऊर्जा प्रकल्प, त्यांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, अडचणी व उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.