
अखेरचे क्रिकेट सामने १९०० साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आले होते. त्यावेळी केवळ ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्या ऐतिहासिक सामन्यात ग्रेट ब्रिटनने विजय मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. तेव्हापासून क्रिकेट ऑलिम्पिकच्या पटलावरून दूर होते. आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमुळे क्रिकेटला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
सामने कुठे खेळवले जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक २०२८ मधील क्रिकेटचे सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमोना शहरातील ‘फेअरग्राउंड्स स्टेडियम’मध्ये आयोजित केले जातील. या स्पर्धेला १२ जुलै २०२८ रोजी सुरुवात होईल, तर सुवर्णपदकासाठीचे अंतिम सामने २० आणि २९ जुलै रोजी खेळवले जातील. एकूण १६ दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
५ नवीन खेळांचा समावेश
२०२८ च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने घेतला. यामध्ये यामध्ये क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश आहे. अलीकडेच कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला होता. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेट खेळले गेले होते. हे टी२० सामने होते आणि त्यातील सुवर्णपदक ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. इंग्लंडला हरवून न्यूझीलंडने या स्पर्धेतील कांस्यपदक जिंकले. त्यात एकूण आठ संघ होते. तर २०१०, २०१४ नंतर आशियाई गेम्समध्ये २०२२ मध्ये क्रिकेट देखील दिसून आले. भारताने येथे पुरुष आणि महिला दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या स्पर्धेत अफगाणिस्तानने रौप्य पदक जिंकले, तर बांगलादेशने कांस्य पदक जिंकले. महिलांच्या स्पर्धेत श्रीलंकेने रौप्य पदक जिंकले, तर बांगलादेशने कांस्य पदक जिंकले.