Tuesday, August 19, 2025

आमदार निलेश राणे आक्रमक होताच आदित्य ठाकरे झाले गप्पगार!

आमदार निलेश राणे आक्रमक होताच आदित्य ठाकरे झाले गप्पगार!

संतोष राऊळ : विधान भवन, मुंबई


विधानसभेत अभ्यासपूर्ण भाषणातून मांडणी करणारे आमदार निलेश राणे जेव्हा आक्रमक होतात तेव्हा विरोधकांची कशी ‘गाळण’ होते हे आज विधानसभेत पहावयास मिळाले. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत मुद्दे मांडताना सताधाऱ्यांवर आणि अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे सेनेवर केलेली टीका आमदार निलेश राणे यांना सहन झाली नाही आणि त्यांची आक्रमकता उफाळून आली. विधानसभेत आमदार आदित्य ठाकरे यांना थेट उद्देशून ‘तुम्ही कोणाला उद्देशून बोलतात आणि जे बोलताय ते कोड्यात बोलण्यापेक्षा हिम्मत असेल तर सभागृहात नाव घेऊन थेट बोला. मग पाहू! अन्यथा शब्द मागे घ्या.’ अशा पद्धतीचे आव्हानच दिले. आमदार निलेश राणे यांची ही आक्रमकता पाहून आदित्य ठाकरे गप्पगारच झाले.सभागृहातील उबाठासह काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तोंडातून एक सुद्धा ब्र काढू शकले नाहीत. एकंदरीतच आमदार निलेश राणे यांच्यासमोर विरोधकांनीही नांगी टाकली अशा पद्धतीचे चित्र सोमवारी विधानसभेत पाहायला मिळाले.


आदित्य ठाकरे यांनी चड्डी बनियन गँग असा उल्लेख केला. ही टीका शिंदे सेनेच्या आमदारांना उद्देशून केली. हे शब्द संविधानिक नाहीत आणि ते उपरोधिकपणाने, विरोधकांना डिवचण्यासाठी उच्चारले याचा आमदार निलेश राणे यांना राग आला. यावर आमदार निलेश राणे आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांना थेट जाब विचारला. चड्डी कोण? बनियान कोण? ते हिम्मत असेल तर सभागृहात नाव घेऊन स्पष्ट करा. आम्ही एक तास तुमचे भाषण ऐकतो आहोत याचा अर्थ तुम्ही काही बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असे होणार नाही आणि तुम्हाला कोणाचे नाव घ्यायला भीती वाटत असेल तर असे शब्द वापरताच का? हे शब्द मागे घ्या. अध्यक्ष महाशय सभागृहातील हे शब्द कामकाजातून काढून टाका. अन्यथा या सदस्याने कोणाबद्दल हे बोलले आहेत ते सभागृहात बोलण्याची हिंमत दाखवावी मग पाहू असे थेट आव्हान दिले. विधानसभेत आ. निलेश राणे यांनी उबाठा नेत्यालाच धारेवर धरल्याने विरोधकांची दोलायमान स्थिती झाली. त्यात नेताच आमदार निलेश राणे यांना भिडण्यास घाबरला. त्यामुळे सहकारी आमदार सुद्धा काही बोलले नाहीत. भास्कर जाधव राणेंचे पारंपरिक विरोधक ते काही तरी बोलतील आणि आमदार राणे यांना विरोध करतील या अपेक्षेने काही आमदारांची नजर सभागृहभर भिरभिरली. मात्र स्तब्ध झालेल्या सभागृहात तालिका अध्यक्षांनी पुढील आमदारांचे नाव पुकारले आणि पुढील कामकाज चालू झाले तेव्हा विरोधी आमदारांनी सुटकेचा श्वास सोडला.


आमदार निलेश राणे आक्रमक झाले की कोणाचाच मुलाहिजमा बाळगत नाहीत हे विरोधकांना सुद्धा बऱ्यापैकी माहीत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांच्यासह अनेक आमदार विरोधी बाकावर उपस्थित होते. मात्र, आमदार राणे यांची आक्रमकता पाहून त्यांच्याशी पंगा कोण घेणार. जो घेईल त्याचा आधी पाणउतारा होणार हे माहित असल्याने सर्वच विरोधक गप्प झाले. काही जण उठून ही गेले. एकंदरीत आमदार निलेश राणे यांच्या समोर भिडण्याचे धाडस उबाठा आमदारांना झाले नाही. एवढा दरारा आज विधानसभेत पहावयास मिळाला.

Comments
Add Comment