रिलायन्सच्या ऊर्जेला ‘एआय’चा प्रकाश

  91

प्रा. सुखदेव बखळे

आता सर्वच क्षेत्रांत ‘एआय’चा वापर होत आहे. भारतात मुकेश अंबानी यांच्या गुजरातमधील रिलायन्सच्या प्रकल्पाच्या निमित्ताने ऊर्जा क्षेत्रात आता ‘एआय’चा वापर सुरू होणार आहे. कंपनीतर्फे हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जात आहे. सौर उत्पादन आणि ऊर्जा साठवणुकीतील कंपनीची गुंतवणूक देशाच्या महत्त्वाकांक्षी शाश्वतता आणि ऊर्जा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

पारंपरिक ऊर्जा स्त्रोतामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जगभरातच अपारंपरिक ऊर्जास्त्रोतावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होते. पर्यावरणाचे रक्षण होते. जगात आता सौर ऊर्जेचा वापर वाढत आहे. चीन आणि अमेरिकेनंतर सौर ऊर्जा उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतात दर वर्षी तीनशेपेक्षा जास्त सूर्यप्रकाशाचे दिवस असतात. त्यामुळे सौर ऊर्जेसाठी अनुकूल वातावरण आहे. ‘इन्व्हेस्टोपेडिया’च्या वृत्तानुसार सौर ऊर्जा उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे. अमेरिका सौर ऊर्जेचा प्रमुख उत्पादक आणि ग्राहक आहे.

२०२३ मध्ये भारताने जपानला मागे टाकत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक बनण्यासाठी लक्षणीय प्रगती केली आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार विविध धोरणे आणि उपक्रम राबवत आहे. २०३० पर्यंत २८० गीगावॅट सौर ऊर्जा क्षमता गाठण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा उद्यानांपैकी एक असलेल्या भारतातील भाडला सोलर पार्कची क्षमता २,२४५ मेगावॉट वीज निर्मिती करण्याची आहे.

भारतामध्ये सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक मोठे सौर ऊर्जा प्रकल्प देशात उभारले जात आहेत. भारत सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सोलर पार्क्स’ आणि ‘अल्ट्रा-मेगा सौर ऊर्जा प्रकल्प’ योजना सुरू केली आहे. असे असले, तरी भारतात सौर ऊर्जेसाठी वापरली जात असलेली पॅनेल आणि अन्य साहित्याचे उत्पादन होत नाही. ते चीनमधून आयात करावे लागते. भारतात हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अदानी आणि अंबानींसारखे बडे उद्योगपती उतरले आहेत. तसाही सौर ऊर्जेसाठीचे साहित्य भारतातच तयार झाले पाहिजे, असा सरकारचा आग्रह आहे.

सरकारच्या या आवाहनाला अंबानी यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार गुजरातमध्ये सौर ऊर्जेचे पॅनेल तसेच अन्य साहित्य उत्पादन आणि सौर ऊर्जा निर्मितीचा भारतातील मोठा प्रकल्प उभारला जात आहे. त्यांनी नवीन ऊर्जा व्यवसाय आणि पेट्रोकेमिकल विस्तारात प्रत्येकी ७५,००० कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखत असल्याचे म्हटले आहे. याबाबत अंबानी म्हणाले की, कंपनीने अक्षय ऊर्जा आणि बॅटरी ऑपरेशन्समधील प्रकल्पांसाठी एक मजबूत पाया रचला आहे. आपण या व्यवसायाचे ‘इनक्युबेशन’पासून ‘ऑपरेशनलायझेशन’पर्यंत संक्रमण पाहणार आहोत.

अक्षय ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत ‘रिलायन्स’ने गुजरातमधील कच्छ प्रदेशात मोठ्या प्रमाणात पडीक जमीन घेतली आहे. ही जमीन उच्च सौर किरणोत्सर्गासाठी प्रसिद्ध आहे. या प्रकल्पातून दर वर्षी सुमारे १५० अब्ज युनिट वीज निर्मिती होऊ शकते. अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी जामनगर येथून एक ट्रान्समिशन लाइन टाकली जात आहे. कांडला येथे कंपनीने नॉर्वेच्या ‘नेल एएसए’सोबत ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी दोन हजार एकर जमीन घेतली आहे. इलेक्ट्रोलायझर प्लांटचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कंपनीने पाच हजार एकरांवर पसरलेल्या आपल्या विस्तृत कॉम्प्लेक्समध्ये सौर उत्पादन सुरू केले आहे. त्यात तंत्रज्ञान आणि खर्च कार्यक्षमता प्रदान करणाऱ्या अत्याधुनिक सुविधा आहेत.

या कारखान्यात ऑटोमेशन आणि प्रगत उत्पादन प्रक्रियेमुळे आयात सौर उत्पादनापेक्षा कमी किमतीत सौर ऊर्जानिर्मिती उपकरणे तयार करणे शक्य आहे. कंपनीने आधीच त्यांची पहिली गीगावॅट-स्केल ‘एचजेटी’सौर मॉड्यूल लाइन सुरू केली आहे. त्यात ७२० वॉट पीकपर्यंत रेटिंग असलेली मॉडेल्स आहेत. सौर मॉड्यूल मजबूत कामगिरीचे मापदंड दर्शवत आहेत. त्यामुळे एकात्मिक अक्षय ऊर्जा उत्पादनात कंपनीचा प्रयत्न बळकट होत आहे. कंपनीने त्यांच्या व्यापक स्वच्छ ऊर्जा धोरणाचा भाग म्हणून ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ ऑपरेशन्स वाढवण्याच्या योजनांनादेखील दुजोरा दिला.

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. २०२७ पर्यंत २० गीगावॅट सौरऊर्जा आणि २०३० पर्यंत शंभर गीगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. कंपनीने ७५,००० कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदींपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक निधी आधीच दिला आहे. या उपक्रमात गुजरातमधील जामनगर येथे पाच हजार एकरमध्ये मेगा-फॅक्टरी बांधणे समाविष्ट आहे. अक्षयऊर्जा उत्पादनाच्या विविध पैलूंना समर्पित पाच कारखान्यांचा त्यात समावेश आहे. तांत्रिक प्रगती आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘रिलायन्स’ सक्रियपणे भागीदारी आणि अधिग्रहणदेखील करत आहे.

२०२४ मध्ये ‘रिलायन्स न्यू एनर्जी’च्या स्टॉकमध्ये सुमारे २०० कोटी रुपये गुंतवले गेले आणि ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त डिबेंचर सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. जामनगर ‘मेगा फॅक्टरी’मध्ये सौर फोटोव्होल्टाइक्स, ऊर्जा साठवणूक, इलेक्ट्रोलायझर, इंधन पेशी आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी उत्पादन सुविधा असतील. संपूर्ण २० गीगावॅट क्षमतेचे प्लांट २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसोबत पहिला वीज खरेदी करार केला आहे. या करारामध्ये २५ वर्षांच्या कालावधीसाठी १२८ मेगावॉट वीज पुरवण्याचा समावेश आहे, जो कंपनीच्या अक्षय ऊर्जा प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे.

२०३० पर्यंत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या नवीन ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून शंभर गीगावॅट उत्पादन करायचे आहे. नवीन ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात ५० अब्ज डॉलर्सची वाढ अपेक्षित आहे. अंबानी यांच्या नेतृत्वाखालील तेल ते दूरसंचार आणि किरकोळ विक्रीक्षेत्रात हा उद्योगसमूह मूल्यनिर्मितीच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. सध्या २४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेली ‘रिलायन्स’ची भविष्यातील वाढ विविध क्षेत्रांच्या विस्तारावर, विशेषतः नवीन ऊर्जा आणि एआयमध्ये मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

रिलायन्स रसायने, डेटा सेंटर आणि रिफायनरीजना वीज पुरवण्यासाठी इलेक्ट्रॉन वापरत असल्याने नवीन ऊर्जा क्षेत्रापासून ६० अब्ज डॉलर्सपर्यंत मूल्यनिर्मितीची शक्यता दिसते. ‘रिलायन्स’चा ‘न्यू एनर्जी व्यवसाय’ आतापर्यंत केलेल्या कोणत्याही उभारणीपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी, खूपच परिवर्तनकारी आणि व्याप्तीमध्ये जागतिक होत आहे. ‘रिलायन्स’च्या ‘ग्रीन एनर्जी प्लॅन’मध्ये गुजरातमधील २००० एकर जागेवर केंद्रित ‘लिथियम आयर्न फॉस्फेट’ बॅटरी उत्पादन आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादन समाविष्ट आहे. कंपनीच्या नवीन प्रकल्पाचा पाया देशाच्या आगामी धोरणाशी सुसंगत आहे. नव्या धोरणानुसार सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी लागणारी उपकरणे आणि यंत्रसामग्री चीनमधून आयात करण्याऐवजी स्थानिक पातळीवर उत्पादित होणारे सौर पीव्ही मॉड्यूल वापरणे आवश्यक आहे.

आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता मजबूत करणे हे जून २०२६ मध्ये अमलात येणाऱ्या या संदर्भातील धोरणाशी सुसंगत आहे. शाश्वत ऊर्जा उपायांसाठीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून कंपनी हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर आणि इंधन सेल प्रणालीदेखील विकसित करत आहे. या नवीन सुविधेसह, हा उद्योगसमूह भारताच्या अक्षय ऊर्जा संक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे. सौर उत्पादन आणि ऊर्जा साठवणुकीतील कंपनीची गुंतवणूक देशाच्या महत्त्वाकांक्षी शाश्वतता आणि ऊर्जा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ही कंपनी भारताच्या अक्षय ऊर्जा भविष्यात एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळवील, यात शंका नाही.

Comments
Add Comment

पुन्हा 'हिंदी-चिनी भाई भाई'?

ज्या चीनशी भारताचा वाद होता, तो चीन आता ट्रम्प यांच्यामुळे मोदी आणि भारताच्या बाजूने बोलू लागला आहे.

क्रेडिट कार्डबद्दल ग्राहकांच्या अपेक्षा

आजच्या तरुणाईला कॅशलेस व्यवहार फारच सोईचे आहेत असे वाटते. त्यामुळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, जी-पे (G pay), पेटीएम

न्यायालयीन ताशेऱ्यांच्यानिमित्ताने...

देशाच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेत्याने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलेच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. विरोधी

हनी ट्रॅपपासून वेळीच सावध व्हा!

आजकाल आपण हनी ट्रॅपबद्दलच्या बातम्या, घटना त्यातून वाढत चाललेली गुन्हेगारी वृत्ती, बदनामीच्या भीतीने घडणाऱ्या

कोकणचे सौंदर्य

कोकण म्हणजे उंच हिरवेगार डोंगर, नद्या-अथांग समुद्रकिनारा! कोकणच्या या सौंदर्यात आणखी भर घालतात ती पावसाळ्यात

एस. टी. तोट्यात का? योग्य विचार व्हावा!

राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस. टी. ही आर्थिक गर्तेत इतकी सापडली आहे, की कर्मचाऱ्यांना महिन्याला