Thursday, September 18, 2025

पुढच्या आठवड्यात ठाकरे बंधूंविरोधात न्यायालयात जाणार - गुणरत्न सदावर्ते

पुढच्या आठवड्यात ठाकरे बंधूंविरोधात न्यायालयात जाणार - गुणरत्न सदावर्ते

मुंबई :  राज्यात २ कोटी लोक हिंदी भाषिक आहेत. ७ कोटी बहुभाषिक होण्यास इच्छूक आहेत. २ कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसारखे आहेत. राज ठाकरे लक्ष द्या, मालदिवमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. राज ठाकरेंच्या विचाराला पूर्ण विराम मिळाला आहे. तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे. सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा. ठाकरे बंधूंच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे दोपहरचा सामना बंद करा, असे देखील सदावर्ते यांनी म्हटले आहे. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषा सक्ती लागू करण्याच्या निर्णयाला मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी केलेल्या विरोधावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच सदावर्ते यांनी या वादात नव्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ. पारसनाथ तिवारी (हिंदी भाषा सेल, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते म्हणाले, "देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात. देशाची भाषा हिंदी आहे. भाषेच्या नावावर कापाकापी करणाऱ्यांना घरात बसवा. कोकणात हजारोंच्या संख्येने हिंदी भाषिक काम करतात. उद्धव ठाकरे आरशात पाहा. विनय शुक्ला हे हिंदी शिक्षक कुणाला शिकवतात, हे त्यांनी स्पष्ट करावं." "गुणरत्न सदावर्ते हे आधुनिक अब्राहम लिंकन" – पारसनाथ तिवारी या वेळी डॉ. पारसनाथ तिवारी यांनी म्हटले, "महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, सदावर्ते हे भारतीय संविधानाचं रक्षण करत आहेत. त्यांनी हिंदी विरोधात राजकारण करणाऱ्यांविरोधात जी भूमिका घेतली, ती धाडसी आहे. ते जीवाची पर्वा न करता लढत असून, ते आधुनिक अब्राहम लिंकन आहेत."

Comments
Add Comment