Sunday, August 3, 2025

‘जेन स्ट्रीट’चा उथळपणा वेशीवर

‘जेन स्ट्रीट’चा उथळपणा वेशीवर

प्रा. नंदकुमार काकिर्डे


समारे २५ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थापन झालेली जेन स्ट्रीट ही दलाल कंपनी. २०२४ मध्ये त्यांचा जागतिक व्यापार महसूल २०.०५ अब्ज डॉलर्स इतका प्रचंड होता. या कंपनीमध्ये ३००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात त्यांची कार्यालये आहे. एकूण ४५ देशांच्या शेअर बाजारांवर खरेदी विक्रीचे व्यवहार करणे, तसेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफ यासाठी 'मार्केट मेकर'ची भूमिका बजावणारी ही कंपनी आहे. भारताबाबत बोलायचे झाले, तर त्यांनी २०२० मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. येथील दोन स्थानिक उपकंपन्या व हाँगकाँग आणि सिंगापूर येथे नोंदवलेल्या दोन परदेशी संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय शेअर बाजारांमध्ये व्यवहार करण्यास प्रारंभ केला. २०२४ या वर्षांमध्ये या कंपनीने भारतीय शेअर बाजारात बँकांच्या समभागांच्या डेरिव्हेटिव्हजमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार करून २.३ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळवला होता. भारतीय शेअर बाजारांवर रोख बाजार व फ्युचर्स अँड ऑप्शन्स अशा दोन पद्धतीचे व्यवहार केले जातात.

याउलट फ्युचर अँड ऑप्शन हे एक प्रकारचे सट्टा स्वरूपाचे व्यवहार असून ते तीन महिन्यांच्या आत पूर्ण करावे लागतात. या दरम्यानच्या काळात शेअरचे भाव सातत्याने खाली-वर होतात व त्यानुसार गुंतवणूकदार किंवा दलाल मंडळी जास्तीतजास्त नफा कमवण्याच्या दृष्टिकोनातून व्यवहार पूर्ण करतात. जेन स्ट्रीट कंपनीने अत्यंत हुशारीने दोन्ही बाजारांमधील खरेदी विक्री, व्यवहार पूर्ण करण्याची वेळ याचा अत्यंत सखोल, बारकाईने अभ्यास करून, अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून डेरीवेटीव्हज बाजारामध्ये निफ्टी फिफ्टी व बँक निफ्टी या निर्देशांकांमध्ये फेरफार करून कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवला.

भारतामध्ये २०२२ ते २०२४ या वर्षात ज्या गुंतवणूकदारांनी किंवा दलालांनी फ्युचर अँड ऑप्शनमध्ये व्यवहार केले त्यामध्ये दहापैकी नऊ जणांना प्रचंड तोटा झाला. असा अहवाल खुद्द सेबीनेच प्रसिद्ध केला होता. याचा अर्थ फायदा होणारी कंपनी जेन स्ट्रीट होती. जेन स्ट्रीट या कंपनीतील दोन कर्मचारी त्यांच्या प्रतिस्पर्धी मिलेनियम मॅनेजमेंट या फंडमध्ये नोकरीस गेले. या माजी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे या व्यवहारांचे अल्गोरिदम विकसित करण्यास मदत केली होती. म्हणजे चोरीच्या मार्गाने पैसे कसे मिळवायचे यावरून दोन कंपन्यांमध्ये झालेला वाद न्यायालयात चव्हाट्यावर आला. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सेबी जागी झाली व त्यांनी कंपनीच्या जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ या सव्वादोन वर्षांतील सर्व व्यवहारांची व व्यापार पद्धतीची सखोल तपासणी ज्याला 'फॉरेन्सिक ऑडिट' म्हणतात तशा प्रकारे केली.

या कंपनीने भारतीय निर्देशांकांमध्ये फेरफार, व्यवहारांची उलटापालट करून तब्बल ३६ हजार ५०० कोटी रुपये निव्वळ नफा कमावल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारचे व्यवहार करणे म्हणजे उच्च पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनुचित व्यापार पद्धतीच्या नियमांचे उल्लंघन या कंपनीने केल्याचे सेबीने स्पष्ट केले. सेबीने याबाबत १०५ पानांचा प्रदीर्घ आदेश तयार केला. एफ अँड ओमध्ये जेन स्ट्रीटने दोन मुख्य रणनीती वापरल्या. त्यातील पहिल्या पद्धतीनुसार ज्या दिवशी बँक निफ्टी या निर्देशांकांची ऑप्शन एक्सपायरी तारीख असेल त्या दिवशी सकाळी बँक निफ्टीच्या विविध घटक शेअरची किंवा त्यांच्या फ्युचरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

परिणामतः बँक निफ्टीवर गेला. त्यांनी बँक निफ्टी ऑप्शन्समध्ये मोठ्या प्रमाणावर 'शॉर्ट पोझिशन्स' निर्माण केली. (म्हणजे हातात काहीही नसताना विक्री केली) त्याच दिवशी दुपारच्या सत्रात हेच व्यवहार त्यांनी उलटे फिरवले व मोठ्या प्रमाणावर ऑप्शन्समध्ये नफा कमवला. त्याच वेळी दुसऱ्या धोरणानुसार त्यांनी व्यवहाराच्या शेवटच्या अर्धा तासात बँक निफ्टीमधील विविध घटक कंपन्यांच्या शेअरची आक्रमकपणे खरेदी किंवा विक्री केली. याचा परिणाम असा झाला की अखेरच्या थोड्या वेळेमध्ये निर्देशांकातील चढ-उतारांमुळे अनेक छोट्या भारतीय गुंतवणूकदारांना प्रचंड धक्का म्हणजे फटका बसला, त्यांना प्रचंड तोटा झाला पण त्याच वेळेला जेन स्ट्रीट कंपनीला मात्र ‘ऑप्शन एक्सपायरी’ व्यवहारात प्रचंड आर्थिक नफा मिळाला.

भारतातील फ्युचर अँड ऑप्शन (एफ अँड ओ) हे व्यवहार म्हणजे एक प्रकारचा सट्टा आहे. या पार्श्वभूमीवर सेबीने अलीकडेच छोट्या गुंतवणूकदारांनी सहभागी होऊ नये, त्यांना विनाकारण तोटा होऊ नये म्हणून जाचक नियम जारी केले होते. याबाबत गुंतवणूकदारांमध्ये नाराजी पसरलेली होती. त्यामुळेच सेबीने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेन स्ट्रीटच्या व्यवहारांचा अभ्यास केला. भारतीय निर्देशांकांच्या व्यवहारांची उलथापालथ करण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याची दखल घेऊन त्यांना भारतीय बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली. ही वस्तुस्थिती असली तरी त्यामुळे भारतीय बाजारांचा उथळपणा यामध्ये स्पष्ट उघडकीस झाला आहे.

जेन स्ट्रीट सारखी परदेशी कंपनी उच्चतंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनैतिकरीत्या व अनुचितपणे कोट्यवधी रुपयांचा नफा कमवते. त्यामुळेच सेबीने केलेल्या कडक कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण दुसरीकडे भारतीय शेअर बाजारांचा उथळपणा जागतिक चव्हाट्यावर आला. त्यासाठी धोरणात्मक निश्चित पावले टाकण्याची गरज आहे हेच जेन स्ट्रीटच्या प्रकरणावरून स्पष्ट होते. केंद्र सरकार व भारतीय भांडवलांचे नियामक सेबी यातून काय शिकतात तेच पाहणे महत्त्वाचे आहे.
Comments
Add Comment